दिल से...

उन्हाने सोलवटलेल्या दुपारी वावटळ उठण्याच्या तयारीत असते, वाळून भुरभूरीत झालेली झाडांची पानं वावटळीचा भाग होण्यासाठी रस्त्यावर घरंगळत निघतात....
दूर कुठे निपचीत पडल्या वाटेवर, वाळल्या पानांचा सडा असतो आणि कुणी एकाकी जीव स्वत:च्या तंद्रीत ती पानं तुडवत निघतो, रस्ताभर पानं चुरचूरत राहतात....
टळटळीत उन्हातला सूर्य तळपत राहतो...
तळपत राहतो!
असे अनेक ऋतू येत जातात,
मनावरूनही निघून जातात,
एक एक पान नव्यान येतं. उमलतं. वठतं. गळून जातं.
असं प्रत्येक पान एक हृदय मानलं तर?
वठलेलं, गळून गेलेलं पान, एक हृदय!
त्याने पाहिलेले, भोगलेले, अनुभवलेले ऋतू त्याच्या करडेपणात स्पष्ट दिसतात.
त्याचं आक्रसलेलं कोरडं शरीर अशा अनेक ऋतूंची कहाणी सांगत कधी पायाखाली येतं
चुरचूरतं...
अशाच एखाद्या ग्रीष्मातल्या शांत संध्याकाळी, भरार वारा सुटला असेल.
उनाड खोड्या करत मुक्त बागडला असेल..
थेट शिरला असेल एखाद्या नाजूक सूबक घरात. टेबलावरती लेखणीखाली ठेवलेलं एक वहीचं पान फडफडवून गेला असेल...!
आणि साद घातली असेल अगदी, अगदी दिल से...!!
त्या सादेला प्रतिसाद देत शुभ्र पांढर्‍या वस्त्रातल्या गुल़झार लेखणीतून, उमटले असतील घनघोर शब्द!
"वो पत्ते दिल दिल थे, वो दिल थे, दिल दिल थे "
सारी वठली पानं भरभर बोलती झाली असतील.
शब्दाशब्दांतून 'गुलझार' उमटली असतील !
ते वहीचं फडफणारं पान, आता ह्या शब्दांचा साज लेऊन अनमोल झालेलं!
ह्या मूळात दैवी झालेल्या पानाला भेटला असावा, ए. आर. रेहमान!!
आणि त्या संगीतसूर्याच्या नजरेतला पारा, कवितेच्या बोलांनी पार  विरघळला असावा, आणि पाझरली असावी एक सुरेख सरगम "दिल से रे...."
हे गाणं संगीतबद्ध करताना जणू रेहमानच्या डोळ्यासमोर असावं एक, जुनाट वठलं झाड! एका फार मोठ्या तलावाच्या काठाशी वाकून उभं असलेलं. पान पान गळून गेल्यानंतर, कोरडं- करडं एकटं उभं झाड.
 जगण्याची आसक्ती मागे सारून आता एक एक फांदी पडते आहे, उंचावरून पाण्यात आणि त्या पाण्याच्या आवाजाने उमटवले आहेत संगीताचे तरंग रेहमानच्या मनात, कानात, आत्म्यात! ते आहेत तसे वापरून मोकळा झालाय तो..... एक अमूर्त संगीत निर्माण करून वेगळा झालाय तो.
ह्या गाण्यात पाण्यावर फटकारे मारल्यावर उठणारा आवाज त्याने वापरला आहे. तो आवाज हा असा त्याला मिळाला असावा, असं मला वाटत राहतं. 
केव्हाही मी "दिल से"गाणं ऐकते, तेव्हा त्या गाण्याची उत्पत्ती ही अशी झाली असावी असं वाटत रहातं. सूर्य, ऋतू, पानांनी साद घातली असेल आणि गुल़झारजींकडून कविता साकारली असेल,
त्या शब्दांनी साद घातली असेल आणि रेहमानने मुग्ध मनःस्थितीत सरगम जगापुढे आणली असेल.
असंच भेटतं हे गाणं मला.... कडकडून...
पायाखाली येणारी हृदयं, आणि पाण्याचा चूळ्ळ चुबूक आवाज!
काटेरी बंधनं आणि कोंडलेली नाती...
उगवणारा सूर्य... वितळणारा पारा
न संपणारं ऋतूचक्र!
पुन्हा उमलणारी नाजूक पानं.. जशी लकलकणारी काळीजं.
वठणारी पानं... जशी संपलेली नाती,
पायाखाली येणारी पानं... जशी नात्याची कहाणी सांगत राहणारी तीच काळीजं.
आणि पाण्यावर उठणारा अखंड निनाद, ह्या सार्‍यांतून अविरत वाहणारं जीवनसंगीत.... आणि न संपणारं ऋतूचक्र!
हे गाणं सुरू होतं एक लयबद्ध इंट्रो घेऊन.
सुरूवातीचा एक संगीताचा तुकडा: इंट्रो!
पुढे एक संगीताची मेजवानी आहे ह्याची नांदी असते त्यात.
गुलझार आणि रेहमान, इंडस्ट्रीमधला एक डेडली कोम्बो!
हे गाणं ऐकताना हृदयाची धडधड ऐकू यावी अशी संगीताची रचना आहे, बीट्स आहेत.
हा इंट्रोच, ह्या गीताचा आत्मा आहे. तो मागेही वाजत राहतो, गाण्याची लय आपल्याला खिळवून टाकते आणि बघता बघता आपणच ऋतूचक्राचा एक भाग होऊन उरतो.
गाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात जातो.
पाण्याच्या आवाजावर तरंगत जातो. 
हे गाणं शांत वेळी ऐकावं.
एकरूप व्हायलाच होतं.
रेहमानची खास गायकी, त्याने घेतलेले चढ उतार. त्याच्या आवाजाच्या संवेदनावर आपणही हिंदोळे घेतो.
अगदी उंच स्वरात सुरू झालेला "दिल से"आणि "पिया पिया"म्हणताना खाली उतरलेला रहेमान....
मुधावस्था!!
ह्या गीतातली पुढे मला मजा वाटते ती, अनुपमा आणि अनुराधा ह्यांनी गायलेला कोरस.
रेहमानच्या हळूवार झालेल्या आवाजाचा मूड सांभाळत, तरल सरगम गायकी!
एक एक कॉम्पोझीशन दैवी उमटतं तेव्हा सारे सूर अगदी रागेंत बसून, आपापल्या जागी डोलून त्या गाण्याला तोलत असतात....  तसा हा कोरस गाण्याची इन्टेन्सिटी अधिक गहिरी करतो..
मागे चुळ्ळ- चुबूक.. चुळ्ळ- चुबूक..
एक एक फांदी डोहात पडतेच आहे...
लकलकतं काळीज...
पुढे शब्द येतात
'दिल है तो फिर दर्द होगा
दर्द है तो दिल भी होगा,
मौसम गुजरतेही रहते है!!'
...जगा बस!
हे चक्र असंच सुरू रहाणार आहे.
का? कशाला? च्या विवंचनात पडूच नका. हे होत रहाणार...हृदयाचं दु:खाशी, दु:खाचं जगण्याशी नातंच असं आहे. साधंसं तत्वज्ञान देतं.
'मौसम गुजरतेही रहते
दिल से, दिल से, दिल से, दिल से,     '
गाडी भरघाव निघून, ब्रेक लावल्यानंतर वेग कमी होतानाचा जो फील असतो,
तो रेहमानच्या ह्या ओळीनंतर ह्या चार वेळा 'दिले से' नंतर अ़क्षरशः जाणवतो. गाण्यातंलं डिसलरेशन असच असावं.... सुस्पष्ट जाणवावं.
खरं तर हे एक प्रेमगीत आहे आणि प्रेमात असताना त्या प्रेमी जीवांची ससेहोलपटही वर्णिली आहे. शाहरूख- मनिषाने ते स्क्रीनवर फार उत्तम सादर केलंय. ह्या कंम्पोझिशनला साजेशी दोघांत इन्टेसिटीही दिसते.
हे गीत म्हणजे त्या चित्रपटातील परिस्थीती सांगणारं, गीत आहे. त्या दोन प्रेमी जीवांच्या मनाला दोन पानांची उपमा देत, त्यांनी काय काय साहिलंय हे सांगणारं ते गीत असूनही, मला हे ऐकताना त्या चित्रपटातील परिस्थीतीशी ते फारसं जोडता येत नाही. ते एक "स्डँड अलोन"म्हणून ऐकण्यात मला जास्त मौज वाटत रहाते. 
एक पान मनात फडफडत राहतं...
अनेक बोलकी हृदयांची पानं...
प्रत्येक संपल्या नात्याचं एक पानं
शिशीरासोबत सर्वत्र गळून चुरचूरताना दिसत राहतात...
आणि शेवटी एक वावटळ उठते..!!!
ही सारी पानं,
गुलझारजींनी गीत लिहीलेला कागदही त्या वावटळीत भिरभरू लागतो
वावटळ उंचच उंच जाते.. जात राहते..
आता धुळीचा भोवरा वगळता काही दिसत नाही...
वाळक्या झाडाची एक- एक फांदी मात्र डोहात पडत राहते...
त्या आवाजाचा र्‍हिदम मागे ठेवत ठेवत, अलवार गाणं संपतं तेव्हा दिल से जी दाद उमटते... तेच हे वर्णन... दिल से!!
-बागेश्री
(मित्रांगण त्रैमासिकाच्या दिवाळी 2015 ह्या अंकात प्रकाशित लेख)

Post a Comment

3 Comments

  1. सबंध चराचर मनात मुरतं तेव्हा त्या संवेदनशीलतेतून हे शब्द उतरतात.नितांत सुंदर!

    ReplyDelete
  2. सबंध चराचर मनात मुरतं तेव्हा त्या संवेदनशीलतेतून हे शब्द उतरतात.नितांत सुंदर!

    ReplyDelete