Thursday, 17 March 2016

फकिरी

बाहेर उन्हं
चटचट तापलेली
कामाचं भलंमोठं
बाड शबनममध्ये
घेऊन तू निघतोस
घामेजला रुमाल
दमलेलं मन
धावणारं शरीर
सारी सांगड घालत
खिशातले चार दाणे
तोंडात टाकत
पाण्याचा घोट घेत
अखंड पायपीट!
रमून जातोस
उशीरापर्यत
अनेक कामात
कधी खूप यश
कधी यथातथा
अशा हिंदोळ्यांचा
प्रवास...
परतून येतोस तेव्हा
वाळ्याचं गार पाणी
अंगणातला गुलमोहर
पाखर धरतो तुझ्यावर
मला तुझं घर म्हणतोस!

तुझ्या हातावर जी 'फकिरी'ची रेघ आहे ना
तीच चिंता करायला भाग पाडते रे
बाकी आपलं छान चाललंय

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...