Friday, 18 November 2016

शेवट

लिहिताना अर्ध्या राहून गेलेल्या सगळ्या कथा त्याने उघडल्या. एका नव्या फाईलमध्ये एकाखाली एक पेस्ट करत गेला. ह्या सगळ्यांना सुरुवात होती, मध्यही होता, काहींना क्लायमॅक्सही पण शेवट कुणालाच नाहीत.. आता तो ते सर्व सलग वाचत जातोय. कथांना बंदिस्त चौकट नसल्याने कुठेच सुसंगती लागत नाहीय. फक्त पात्रे. बोलकी पात्रे. ती पाहता पाहता आपापल्या जागा सोडून मोकाट फिरू लागली. एका कथेतून निघून दुसऱ्यात शिरत चालली. प्रत्येकाची काही मागणी, स्टँड आहे. इच्छा आणि महत्वाकांक्षा आहेत. कुणी फक्त गोष्टीला पुढे नेण्यापूरती साकारलेली आहेत. कुणाच्याही गोष्टीला कुणीही ढवळून काढतंय. एकाच्या गोष्टीत दुसऱ्याला जागा दिलेली नसल्याने सगळ्यांचाच एकत्रित गोंधळ उडालाय.
प्रत्येक पात्राला त्याचा स्वभाव आखून दिल्याने हा गोंधळ चौपटीने वाढलाय. अनाहूतपणे भलत्याचीच एंट्री झाल्याने आधीचं पात्र गडबडतंय. ज्याने भलत्या जागी एंट्री घेतलीय त्याला तो तिथे का आहे, हे समजेनासं झालंय. सारे एकमेकांकडे स्तब्ध होऊन बघातायत किंवा दिलेले संवाद बोलतायत. संवादाचे अर्थ हरवलेत. परफेक्ट वाटणारी पात्रं वेडसर वाटू लागलीयत. ह्याचा संवाद त्याला कळेना, कारण ह्याची कथा त्याला ठावे ना. पात्रा पात्रांची अनोखी भेट, अनोखे कन्फ्युजन. त्यांना एकमेकांशी जुळवून घेता येईना, एकमेकांशी भांडताही येईना.. सगळ्यांना रस्ता चुकल्याचं कळतंय, सगळे एकमेकांना मदत करू पाहताय, पण प्रत्येकजणच चुकल्याने मार्गदर्शनही चुकू लागलंय....
चुकत भटकत लेखकाच्या दाराशी मात्र आता ही पात्र हळू हळू जमू लागलीयत, शेवटहीन पात्रे जाब विचारायला सज्ज झालीयत आणि लेखकाला घाम फुटू लागलाय. त्याने घाबरून प्रत्येक कथा वेगळी करत पुन्हा सेपरेट फाईलमध्ये सेव्ह करायला सुरुवात केली तशी, बाहेर जमलेली एक एक पात्र तिथून नाहीशी होऊ लागली, पाहता पाहता बाहेर कुणीच उरलं नाही.....

...  साऱ्या अर्धवट उरलेल्या कथांना शेवट देण्याचा निश्चय त्याने झोपेतच करून टाकलाय!

-बागेश्री

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...