बेदरकार


तुझा सख्खा हट्ट,
आणि माझ्या इच्छा मात्र, सावत्रासारख्या!
माझ्याच घरात
मला पाठ करून उभ्या..

आजही हट्ट धरावा, इतका मी तुला

विश्वासू वाटतो -
ह्या समाधानाचं हसू आणि
कैक दिवसांनी हसण्यासाठी
विलगलेले ओठ!

तुझ्या हट्टाचं, माझ्या

संयमाशी कधीच पटत नसतं!
त्यातच सवय मोडलेली -
कुणाचं ऐकून घेण्याची!

मग आपसूकच दरीचं विस्तारणं,

तुझं उदास मनानं परतणं...
आणि तू गेल्यावर, तुझ्या हट्टानं
माझ्या पुढ्यात रेंगाळत राहणं,
घरातल्या नकोशा गुंतवळाप्रमाणे..
मी त्याला उचलून बाहेर टाकणं... अन्
पुन्हा जगण्याच्या एका कोपर्यात
जाऊन बसणं...

तुला हक्काचा वाटलोच इथून पुढेही,

तर तू येशीलच.
तेव्हाच हे दार किलकिलं होईल
तुला आत घेण्यासाठी,
रूसून तू जाण्यासाठी...

- बागेश्री

(मायबोली दिवाळी अंक 'हितगूज' २०१३ मधे प्रकाशित)

Post a Comment

0 Comments