तावदान

जमेल का कधी
मनाच्या खिडकीला
बसवून घ्यायला
एक तावदान?
पातळ काचेचं,
बाहेरचं आत दिसू देणारं
आतलं मात्र काहीच न दाखवणारं
एक तावदान...!
आरपार खिडक्यांतून
बाहेरची वादळे
बेधडक शिरतात आत,
लख्ख किरणेही शिरतात आणि शिरते
धुळही..
आपलं असं हक्काचं, साधं स्वच्छ नितळ
काही उरत नाही..
प्रत्येक गोष्टींवर साचते
इतरांच्या मतांची
धूळ...!
आतलं सारं काही झटकून
घ्यावे लावून,
मनाच्या खिडकीवर
एक तावदान...
आणि नाहीच जमलं काही तर
किमान, घट्ट मिटून घ्यावेत
गहिरे गहिरे डोळे
मनाचं स्पष्ट बिंब,
सदैव घेऊन फिरणारे
पारदर्शी डोळे...!
-बागेश्री

Post a Comment

0 Comments