अहंकार

तो घरात येताच नोकरावर ओरडला,
"ए, बघतोस काय माझे बूट काढ"
पत्नी तिथे येऊन विचारती झाली,
"कधीपासून तुम्हांला विचारावे म्हणते, तुम्ही रोज कुठे जाता, की तुमचे बूट इतके बरबटतात.. पाऊस पाणी नसताना बुटांना चिखल कसा लागतो, आणि हा चिखल असा रंगबिरंगी, आकर्षक कसा?"
मोठ्याने हसत, उर्मटपणे तो म्हणाला,
"हे जाणून घेण्याची गरज तुला काय? माझ्या मोठ्या पदामुळे, आलेली सत्ता, संपत्ती हे सगळे तू उपभोगायचंस आणि आनंदी रहायचंस..."
ताड ताड पाऊलं टाकत तो आपल्या खोलीत निघून गेला...
नोकराला त्याच्या बाईसाहेबांची विमनस्क स्थिती पाहवली नाही, तो खालमानेने उत्तरला,
"बाई,
लोभ, माया, व्यसनं, मत्सर, राग, वासना, ह्या सम्द्याचा चा तो रंगबेरंगी च्चिख्खल आहे....
आलोच म्या ह्यो अहंकाराचे बुट सोच्छ करुन, उद्या पुन्यांदा त्यास्नी घालायला लागतील"
बाई लगबगीने पुढे येत म्हणाली,
"त्यापेक्षा घराबाहेर फेकून दे हे बूट, सर्व समस्यांचे हेच कारण आहे कळल्यावर क्षणाभरही ते घरात नकोत, निदान त्यानंतर, सगळे काही असूनही, नसलेले 'सौख्य' आपल्या पावलानं चालत येईल घरी..."
-बागेश्री
(10 August, 2012 )

Post a Comment

1 Comments

  1. yes,absolutely fantastic, quite true & hard-hitting !

    ReplyDelete