गुलमोहर- व्हरांडा- तो- ती! उगाचंच...

एकसुरी लांब रस्ता तुला कधी आवडायचा नाही, वळणाची वाट पाहत तुझा डोळा दमायचा नाही...
म्हणूनच बहुधा तुला
माझं घर आवडायचं,
येता जाता वळणावर
रेंगाळणं तुझं व्हायचं

मग,
खिडकीतून तुला पाहत राहणं,
उबदार हवेचं गार गार होणं..
गुलमोहरानेही लालबुंद मोहरून येणं
व्हराड्य़ाचं दाराबाहेर आश्वस्त होत जाणं
........उगाचंच!

तू रोज तिथून जायचीस,
काहीबाही करत रेंगाळायचीस

कधी हातातली वह्या पुस्तकंच नीट कर,
कधी पायाला न रूतलेलं काही थांबून बघ,
गुलमोहराची कळीच हलके वेच, किंवा
सावरलेल्या केसांना पुन्हा एकसारखं कर,
...... उगाचंच!!

मग,
नजरांचं फितूर होणं,
पावलांचं रेंगाळणं,
हुरहूर घेऊन झोपणं,
रोज एक स्वप्न,
सकाळी धडपडत उठणं
आपल्याच जगात असणं,
स्वत:शी खुदकन हसणं,
.......उगाचंच!

आता कधी वठला गुलमोहोर,
थकल्या व्हरांड्याशी गप्पा मारत असताना, आपल्या वेडेपणाला हसत असेल नाही?
की, तोही गप्पा मारण्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींत माझ्याइतकाच रमत असेल,
..... उगाचंच!!

-बागेश्री


Post a Comment

0 Comments