माझ्या एका संध्याकाळी (पाऊसवेळा)

माझ्या एका संध्याकाळी
ढगांवरून पायउतार होशील?

माझं नाव विसरुया
तुझं गाव विसरूया!

खोल दरीत उतरत जाऊ
प्रपातांचे तुषार होऊ,
काळाला ओळख देऊ नकोस
वेळेकडे पाहू नकोस

कुणी उंचावरचा कडा डोकावेल खाली
म्हणेल आज नवी हालचाल कशी झाली,
विचारेल आपल्याला नाव- गाव- पत्ता
म्हणेल इथे चालते फ़क्त आमची सत्ता,
तिथून पटकन मग उडूनच जाऊया
नदीच्या वळणांवर हळूच गुडूप होऊया!

हातातल्या हातांना मग बोलू दे निवांत
मनामधले काहूरही होत जाईल शांत,
अशा काही क्षणांसाठी आसूसले होतो
तुझ्या- माझ्या वेळेसाठी ताटकळले होतो..

पडेल पिठूर चांदणं आपल्या अवती भवती
भरेल माझी दमली झोळी कधीचीच रिती,
मुक्त वाहत्या पाण्याला करुन घेऊ स्पर्श
भिनून उरेल रोमरोमी शहारला हर्ष..

परतीचा प्रवास मग खुणावेल जेव्हा
मनामध्ये पुन्हा काही तुटेलच तेव्हा,
आलो तसे पुन्हा उंच उडत जाऊ
तुझे माझे नाव- गाव पांघरूण घेऊ..
ढगांवर फिरून, होण्याआधी स्वार
घेशील ना सामावून, मिठीेत उबदार?

कधीतरी पुन्हा असाच अवचित येशील?
माझ्या एका संध्याकाळी,
......पायउतार होशील?

-बागेश्री

Post a Comment

0 Comments