झोळी

त्याने मनाचा, वागणूकीचा, प्रेमाचा ओलावा द्यायचा नाकारल्यानंतर
तिने गळ्यात झोळी अडकवली..
वाटलं तिला,
खांद्याला झोळी आणि मनात मागण्याची इच्छा
इतकंच पुरे, हवं ते दान मिळवायला.
झालंही तसं
कैक देणारे उभे राहिले.
डोळ्यांत कसली- ना- कसली आस घेऊन,
बदल्यात काही- ना- काही मिळेलच म्हणून....
खूप फिरली.
दमली- भागली.
रिकाम्या झोळीने घरी परतली.
त्याने दरवाजा उघडला.
ओळखीचं हसू झोळीत घातलं,
ठरलेलं. प्रमाणातलं. तितकंच. नेहमीचं.
आणि आपल्या कामाला लागला.
कळून चुकलं तिला
हेच आपलं आहे.
इतकंच आपलं आहे.
तिला झोळी गच्च भरल्यासारखी वाटते आहे.

-बागेश्री
 

Post a Comment

0 Comments