दाटून आलेल्या चांदणनभी,
एखादा लख्ख तारा टिमटिमत राहतो..

'मनाचा समूद्र' होतो आणि 'शरीराचा किनारा!'

वारा सुटतो
केस भुरभूरतात
पाऊलं रुततात
काळा गडद अंधार..

खारा वास
नितळ श्वास..
उष्ण उसासा,
उग्र- कोवळी गाज

ओठांवर खारेपणा उतरतो
'किनारा' नखशिखांत ओलावतो....

मन आवडू लागतं
त्याचे एक- एक पदर सुट्टे होत जातात
किना-यावर लाटा, आदळत राहतात

मोकळी ओढणी तरंगतेय की आपण?
फरक न कळण्याइतका हलकेपणा येतो
जडत्वाला झुगारुन देतो..

एकच तारा टिमटिमणारा
आतल्या सागरास पुकारणारा....
सादेला जो प्रतिसाद देतोय
आतून बाहेर पसरत जातोय

दोन सागरांची उराउरी भेट!

किनारा मात्र, जाणवेनासा झालाय....

-बागेश्री