ख़याल

त्याचा माग सोडणं आज शक्यच नव्हतं..
बेफाम, बेछूट रानवारा प्यायलेला, तो!
आणि त्याची गती गाठण्याच्या, 
वेड्या ध्यासानं पछाडलेली, मी!

आजची त्याची खेळी, ठाऊक नाही!
होणारी दमछाक, ठाऊक नाही!
त्याने जंगलातला नवा मार्ग घेतलाय,
पायाखालचा नसलेला रस्ता..
धाव थांबत नाही
धाप थांबत नाही
त्याचा प्रचंड वेग
माझा धुमसता आवेग
चपला फाटून कधीच साथ सोडून गेलेल्या
अंगावरच्या कापडांची लक्तरं व्हायची वेळ..
तो उथळ नदीतून पुढे
मी पाण्याच्या लपलप आवाजात मागे..
मो़कळ्या उथळ पात्रात त्याला गाठता येईलच,
विश्वासाने गती वाढवलेली मी
क्षणात पैलतीर गाठून पुन्हा घनगर्द जंगलात शिरलेला तो...
ह्या जंगलात आता त्वचेचाही थर फाटू लागलाय
जागोजागी तरारुन रक्ताचे थेंब उठलेत...
तो कुठल्याशा वळणावर पूसटसा दिसतो,
खिजवतो,
दिसेनासा होतो...
माझी गती धिमी होते
एक असीम शांतता...
धपापता उर आणि
हृदयाची धडधड..

शिकारी अन् सावजाची खेळी 
उग्र पाठलाग आणि निचरत जाणारी शांतता
आत आत धावत आले आहे
घशाला कोरड जाणवतेय
दूर खळाळतंय पाणी, 
धाप शमतेय,
निसर्ग साद घालतोय
चारही बाजूने घेरून बसलाय,
मघापासून मागे टाकत आलेली 
झाडं, वारा, पाणी सारं भोवताली शांत पहूडलंय
ह्या सार्‍याची भूल पडते आहे..!
हे सौंदर्य आसपास असून, ध्यानातही येऊ नये?
कळतंय आता,
त्याचा माग काढताना, कितीतरी हातच्या गोष्टी निसटत जात आहेत.. 

छे!
एकाच खयालाचा असा पाठपूरावा करणं थांबवलंच पाहिजे..

-बागेश्री
13 जुलै 2015

Post a Comment

0 Comments