एक प्रवासवर्णन

"....दिदे, सरळ उभी रहाय की गं, कित्ती हलायलीस, आणि साडी पण असली घेतली आहेस ना ही, एक पण मिरी उघडून पुन्हा घडी जर घातली ना, तर त्या घड्या पडलेल्या दिसतात, अन् तू हलतीस ना इतकी, कश्या पाडू सांग, मी एकसारख्या मिर्‍या??"

अनघा 'नांदेडी' ठसक्यात फणकारलीच...

"अगं अनु, मग तो मोबाईल दे ना, बघु नवर्‍याचा मेसेज आलाय का ते?"

"चल काही पण, तू आणि जिजाजींनी ठरवलेय ना, की लग्नाच्या १५ दिवस आधीपासून ते सीमंतीपूजना पर्यंत बोलायच पण नै, मग ते कसलं मेसेज करतात? तुझ्यापेक्षा जिद्दी भेटलेत दिदे तुला... अग्गं दिदे, ह लू न क्को स्सssss"

"बरं गं बाई हलत नाही.... अग्गं बघ ना तासाभरात सीमंतीचा कार्यक्रम होईल सुरू, पार्लरवालीचा पत्ता नाही... माझा मेक अप व्हायचाय, वरात आली की नाही माहित नाही... सगळे आपले वरातीच्या स्वागताला गेलेत, इथे तू आणि मी!.. माझ्या मेलीचं पण ना काहीतरी खुळ असतं, म्हणे लग्ना अगोदर १५ दिवस बोलूया नक्को... संसार सुरू करताना थोडी अधिरता पाहिजे... आता देशमुख मंडळी पोहोचली की नाही, ते कसं कळायचं?"

"घे दिदे, हा फोन घे, आणि कर जिजा ला कॉल, पण हलु नकोस माते, साडी नेसवून होतच आलीये, मग ती पार्लरवाली मो़कळी तुझा मेक अप करायला..."

आणि मोबाईल वर ह्यांचा १५ मिनीटांपुर्वीच आलेला मेसेज होता, "तेर घर आया, मै आया तुझको लेने...."

काय वाटलं...?

आनंदची एक लहेर... तिच्या मागोमाग आलेलं ओठांवर हसू... माझी मामेबहिण कशी चुकवणार होती ते?

"दिदे, आली ना वरात? सह्ही... चल मी चाल्ले जिजूंना पाहायला... अन अगं आल्याच की ह्या आँटी, घे तू मेक अप करून.. दिदे लाजायलीस किती गं.. मज्जा वाटतेय मला"

"अनु, चिडवू नकोस गं.. धडधड ऐकू येतेय माझीच मला, आणि आईला पाठव ना इथे, सोयर्‍यांचं स्वागत झालं असेल तर ये म्हणावं... ताई करा तुम्ही मेक अप"

२८ एप्रिल २००७, साधारण संध्याकाळी ७ ची ही लगबग, अंबिका मंगल कार्यालय, नांदेड येथील वधूपक्षाच्या, वधुच्या खोलीतील!! भर मे महिन्याच्या तोंडाशी आयोजित ह्या लग्नसमारंभाला 'देशमुख' मंडळींची वरात पुणे- औरंगाबाद- नांदेड असा प्रवास करत आली 'एसी' बसमधे, आज सीमंतीपुजन आणि उद्या लग्नसोहळा, असा थाट!

पुणेरी मंडळी खवैय्या अगदी, म्हणून आई- बाबांनी नांदेडचे सगळे प्रसिद्ध केटरर्स धुंडाळले होते, एसी बस त्यांच्या आरामासाठी योजली होती... हे सारं मूक मनाने पाहत होते, सर्व जुळवण्यासाठी त्यांची तगमग- तडजोडी, मनात साठवत होते!
सीमंतीपुजना नंतर, रात्रीच्या जेवण्याच्या पंगती झाल्या.
"व्वा, देवडेसाहेब, आमरसाने मज्जा आणली, कार्यालय उत्तम, खोल्यांमधे कुलर्स बसवलेत ते फार छान केलंत आपण.. जेवण उत्तम, कार्यालयाची सुविधा उत्तम...." असे भावी सासरेबुवांकडून मिळालेले दिलखुलास शेरे, माझ्या आई-बाबांनी समाधानानी चेहर्‍यांवर मिरवल्याचं आजही आठवतं!

ती रात्र... उद्या मी 'देशमुख' होणार... जाणवून देणारी...आणि त्याच सोबत

माझा भाऊ, आई-बाबा, मावशी-काका, ३ मामा-३ मामी , काका- काकू, - त्यांची पोरं काय धिंगाणा घातला नसेल? दोन्ही आज्यासुद्धा शामील, अगदी काष्ट्याचा पदर खोच्चुन!!

अंताक्षरीच काय, मला चिडवून बेज्जारच केलं काय...जिजाजींचे बुट चोरणे हा हक्काचा प्लॅन तयार होतो काय.... करंज्या, बेसनांच्या लाडवांपासून ते चकली पर्यंतचे सगळे पदार्थ चाखत जी 'वधुपक्षा' कडे धम्माल चालू होती ती खरंच्च आधी कधीच आली नसावी...

सकाळी ६ ला, माझं लग्न, आणि रात्री २.३० पर्यंत हा धुमाकूळ!!

त्या रात्री माझे मोठे मामा, रात्रभर कार्यालयात फेर्‍या मारत होते... इतके लोक आहेत, प्रत्येकाकडे दाग- दागिने आहेत.. उगाच काही वरखाली नको व्हायला म्हणून ती काळजी घेणारे मामा, कितीतरी पटीने मला मोठे भासले..!

सकाळ फार पटकन आली असं वाटायला लागलं!

सगळे तयारीत गढून गेले... माझ्याभोवती सारे होते.. मला पटापट सजवण्याची लगबग, आईची आहेरांची तयारी.. मामा-मावशींची सोयर्‍यांची सोय बघणे, सगळं पाहून मला सारखं भरून येत होतं.... काल रात्रीचं हसू कोमेजलं जरासं!!

शालू नेसून तयार झाले... मन अधीर, अधीरच होत चाल्लं होतं..

"मुलीचे मामा, मुलीला घेऊन या"
ही गुरुजींनी माईकवर घोषणा केली आणि अंगावरच्या रेशमी शालूला जबाबदारीचे काठ लागल्याची जाणीव झाली!

मामा खोलीच्या दाराशी आलेच, "दिदी, तयार आहेस बेटा?" आवाजातला गहिवर खूप काही सांगून गेला!

क्षणभर होकारार्थी मान हलली आणि पावलं दाराकडे वळली, दाराशी अडखळले जराशी ,मागे वळून पाहिलं, नकळत माझ्याही...... माझं आडनाव आणि बालपण तिथेच राहिलं होतं!

खोलीपासून ते बोहल्यापर्यंत जाताना, मामांनी क्षणभर डोक्यावर हात ठेवला, आमची नजरा-नजर झाली, डोळ्यांतच पराकोटीचा आधार दिसला...

बोहल्याच्या पायर्‍या चढतांना, आंतरपाटा-पलीकडलं आयुष्य खुणावत होतं!

एक रोपटं, आपली पाळं-मुळं घेऊन निघालं होतं, माहेरची संस्काराची शिदोरी गाठीशी ठेऊन... सार्‍यांना आपलं करण्यासाठी!

दुसर्‍या घरी रुजण्यासाठी...

-बागेश्री
(वधूपक्षाच्या खोलीपासून ते बोहल्याचा प्रवास)

Post a Comment

0 Comments