Monday, 5 October 2015

शर्यत

स्वप्नांनी लगडलेलं झाड आहे
मनाच्या घट्ट मुट्ट मातीत..
आशेचे पक्षी, इच्छांचे किरण
अंगावर घेत बाळसेदार झालेलं

त्याच्या सावलीशी मी
रमायचे कित्येकदा
सुंगधी झूळका अनुभवत बसून राहण्याचा
छंद होता खुळा
अशाच एका निवांत क्षणी
डोळ्यांसमोर दुडदूडत गेला लोभाचा ससा आणि
भान आलं आपण शर्यतीत मागे पडल्याचं...
तेव्हापासून धावते आहे
ही शर्यत संपत नाही
ही धाव थांबत नाही
कधीतरी ते झाड आठवतं आणि व्यवहारी मन तत्परतेने सुचवतं,
'ती जागा साफ करून एखादा टुमदार बंगला बांधायला हवा!'

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...