सुचतं कसं?

स्वत:ला हळवं, कातर करून
वा-यावर द्यावं लागतं सोडून
तेव्हा झरते एक कविता
ओठातून मनावर
बोटातून कागदावर

डोळ्यांत स्वप्ने हलतात लकलक
मनाची घालमेल, 
जीवाची तगमग..
कधी आपलं कधी परकं
दु:ख घालत राहतं साद
अथांगाच्या गर्द पोकळीत
विरत जातो एक पडसाद
शब्दांमध्ये सारे
पकडत जाते तरलता,
शक्य अशक्यांच्याही
पडतात गाठी बरेचदा

टिपतं जातं मन सतत
पुसटसं क्षितीज
विरलेली कोर
हरवला पाऊस
नभ भावभोर..
काळवंडली वेदना
सुखाचे मोर
साकळला अश्रू
चांदणं टपोर....

आणि तू विचारतोस ,
कविता सहजच सुचत असेल ना?

-बागेश्री

Post a Comment

4 Comments