Wednesday, 3 February 2016

गुपीत


मी माझा उंबरा ओलांडून
माझ्याबाहेर जाते तेव्हा..

मी माझा उंबरा ओलांडून
माझ्याबाहेर जाते तेव्हा,
नसतेच ह्या जगाने
आखून दिलेली व्यक्ती
वा अनेक मर्यादांच्या दो-यांवर
डोलणारी कळसूत्री..
नसते कुणाची
वा कुणी माझे
उरतं केवळ
निर्मम, एकल
शांत, निरामय
चैतन्य..
निसर्गसमान,
निसर्गातलं
एक चैतन्य..
जगून घेते
माझं जगणं
माझ्या व्याख्येत मावणारं
उडते दमते
बसते फुलते
विखरून जाते
एकवटते
मी माझ्याबाहेर असते तेव्हा..

कवितेचा बूट
ही सफारी घडवून
आणत असला तरी
वास्तवाचा ठोका पडताच
उंबर्‍याला दिलेलं वचन
पाळण्यासाठी चौकटीत
परतून यावंच लागतं
अंगावर चढतात तीच जीर्ण पुटे
चिकटतात दोर्‍याही आपसूक..

मी माझ्यात अशी परतले तरी
चेहर्‍यावरची आभा मात्र
काही गुपीतं राखूच शकत नाही....

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...