मी स्वतःच सगळं अस्तित्व एकत्र करुन तुला पत्र लिहायला बसते आणि सारे शब्द अगदी माझ्यासमोरून सैरावैरा निघून जातात. सुन्न नजर कागदावर रेंगाळत राहते. बघता बघता तो कोरा करकरीत शुभ्र कागद एक भलामोठा कॅनव्हास वाटू लागतो. जगण्यातल्या असंख्य क्षणांचे रंगीत फराटे त्यावर उमटू लागतात. कुठे फिके, कुठे गडद, अनेक रंग, असंख्य छटा. हळू हळू एक चेहरा आकाराला येतो. मी मागे रेलून बसते, चित्र न्याहाळत राहते, त्या चेह-याशी जगण्याचे संदर्भ जुळवू पाहते..
तुला आठवतं, एकदा पावसाळा सरता सरता तू आणि मी पाठीवर हॉल्डॉल लटकवून थेट ट्रेक करायला निघालो होतो, थोड्याशाच शिदोरीनिशी! तसंही आपण सोबत असतो तेव्हा स्नेह, माया, प्रेम आणि बुद्धी सगळीच भूक इतकी समर्थ भागलेली असते की पोट फारसं साद घालतच नाही.
...त्या संध्याकाळी तंबू ठोकून सह्याद्रीचा पायथा पकडून आपण बसलो होतो. नीरव शांतता. अथांग हिरवळ. पावसातला गारठा. त्यावेळी आकाशावर उमटलेली सांज आणि आता ह्या कॅन्व्हासवर दिसणा-या रंगछटा ह्यात फार तफावत नाही....
...त्या संध्याकाळी तंबू ठोकून सह्याद्रीचा पायथा पकडून आपण बसलो होतो. नीरव शांतता. अथांग हिरवळ. पावसातला गारठा. त्यावेळी आकाशावर उमटलेली सांज आणि आता ह्या कॅन्व्हासवर दिसणा-या रंगछटा ह्यात फार तफावत नाही....
एकदा कुठलीशी नक्कल करून आपण खदखदत हसत सुटलो होतो. डोळ्यांच्या कडा पाणवेपर्यत हसलो होतो तेव्हाच सभोताल गर्द निळाई भरुन उरली होती. तोच निळा ह्या चित्रात बॅकड्रॉपला घट्ट बसला आहे..
तुझं स्वत:शीच मग्न असणं आणि तास न तास आसपास कुणी नसल्यागत स्वतःतच रमणं. हे अनुभवताना जो गूढ भास माझ्याभोवती तरंगतो, अगदी त्याच भासाचे आडवे तिरके फराटे चित्रातल्या चेह-यावर स्पष्ट दिसत आहेत.
...... अनेकदा किती न किती बोलत बसतो आपण, अध्यात्म आणि चैतन्याबद्दल, तेव्हा संवाद कुठे घडत असतो आपला? तू निसटून स्वतःत बुडी मारलेली असतेस आणि मी माझ्यातच बुडू- तरंगू लागते. आपण आपल्याशीच घट्ट झाल्याचे गडद रंग आहेत ह्या चित्रात हे व्यवस्थितच कळतंय आता...
कधी फार गंभीर प्रसंग येतात, तेव्हा आयुष्याच्या हस-या ओढ्याकडे एकमेकांना घेऊन जातो आपण. ही कला फार दैवी आहे, तुझ्या माझ्यात उतरून आहे... त्या ओढ्याचा नितळपणाच ह्या चित्रातल्या डोळ्यांत आलाय बघ. हे डोळे तुझ्याइतके गहिरेही आहेत, माझ्याइतके स्वप्नाळूही.
लांबच लांब डांबरी सडकांवरून तर कधी चुकार निमूळत्या पायवाटेवरून अथक भटकत असताना, एखादवेळेस खूप बडबड तरी कधी अबोल वाटचाल करत असतो. फक्त एकमेकांकडे पाहून 'असल्याची' खात्री होते. चेहर्यावर समाधान येतं, ओठांचे कोपरे कानाकडे सरकतात. त्या स्निग्ध हास्याचीच लकेर चित्रातल्या ओठांवर आलीय! बाकी काही नाही.
झाडावरलं फूल खुडणं न तुझा स्वभाव न माझा. प्रत्येक आयुष्याने त्याच्यापरीने खुलावं, त्याच्याकडे पाहून इतरांनी आनंद घ्यावा पण त्याचं नैसर्गिक असणं खुडू नये. अस्तित्व कधी खोडू नये ह्या विचारधारेचे आपण.. त्या अखंड फुललेल्या फुलांचाच गंध ह्या कॅनव्हासला येऊ लागलाय!
आता हे चित्र बरोबर माझ्यासमोर स्थिर उभं आहे... ते एकटक पाहता पाहता... डोळे नकळत झाकले जात आहेत... खरंतर सारे संदर्भ लागल्याच्या आनंदानेच मला ग्लानी आलीय...
..... आजही तुला पत्र लिहायचं राहून गेलंय!
-बागेश्री
0 Comments