प्रेक्षक

प्रेक्षक होता आलं पाहिजे
आपल्याला आपलाच प्रेक्षक होता आलं पाहिजे!

रंगमंचावर वावरणा-या कलाकाराला बघताना आपण त्याच्या सुख- दुखाशी समरस होतो, त्याच्या अभिनयाने इतके भारावतो की त्याच्याबरोबर हसू रडू लागतो. खेळ संपला की बाहेर पडताना ते नातंही संपतं. तेवढ्या प्रसंगापुरता आपण त्याच्याशी जोडले जातो नंतर पूर्णतः विभक्त होतो. कारण आपण फक्त प्रेक्षक असतो.

ही भूमिका स्वतः बाबतीत घेता येऊ लागली की तटस्थ असण्याची अवस्था विकसित होऊ लागते.
एखाद्या प्रसंगात आपला आवेग, दुःखातिरेक, आनंद, म्लानपणा, उदासी, त्रास सगळं काही पुढच्या रांगेत बसलेल्या प्रेक्षकाप्रमाणे बघत राहायचं. आपण प्रेक्षक असताना आपल्या आत एक जाणीव सजग असते 'हे सगळं तात्पुरतं आहे' ही जाणीव! त्या जाणिवेतून आपण आपल्याला पाहू लागलो की क्षणिक गोष्टींनाही आपण आयुष्यात किती मोठी जागा व्यापू देतो, ध्यानात येतं.

स्वतःचा प्रेक्षक होणे ह्यासारखं मनोरंजन नाही. आपल्यातले कच्चे पक्के दुवे स्पष्ट डोळ्यासमोर येतात. आपल्याला इथे येऊन सुख दुःख क्षणिक जगायची आहेत, ह्याचा विसर पडल्याचं कळतं, पुन्हा आत्मभान मिळतं.

आपण मिळालेल्या आयुष्याची स्वतःला चौकट मारतो, स्वतःला त्यात कोंबतो. आयुष्य निव्वळ आपला एक भाग आहे. आपण त्याच्या पूर्वी आणि नंतर अनंत असतो, एक प्रेक्षक म्हणून.

-बागेश्री

Post a Comment

0 Comments