गणपती बाप्पा मोरया

आपल्याकडे देव इथे मूर्ती म्हणूया, बसवणे म्हणजे प्रतिष्ठापना करणे आणि यथावकाश त्याचे विसर्जन करणे ही परंपरा आहे. ती कशी, कुठून का आली असावी हे त्या-त्यावेळी असणार्‍या अनेक सामाजिक, धार्मिक राजकीय उद्देशांवर अवलंबून असेल. शिवाय प्रेम, आपुलकी, माया, लोभ, राग ह्या भावना जशा जन्मतःच आपल्या आत असतात अगदी तशी भक्तीही असते. विशुद्ध भक्ती. तिला सगुण रूप देण्याचा गरजेपोटी अनेक मुर्त्या साकाराल्या आल्या असतील, तो भाग अलाहिदा. थोडक्यात तुमच्या आतली सगळ्यात सात्विक भावना, जी व्यवहाराच्या पलिकडची दुर्दम्य आशावाद असलेली ,सकारात्मक उर्जा आहे तिचं ज्याच्याठायी समर्पण होतं तो ज्याच्या- त्याच्यापुरता देव!   
माझ्या एकटीपूरती देवाची व्याख्या म्हणजे, तुमच्या जगाचा व्यापार निरंतन बघणारी आणि सगळे रस्ते बंद झाले आहेत असं वाटताना उदास मनात आस तगती ठेवणारी अनाकलनीय शक्ती म्हणजे देव. ते कधी तुमचं मन असेल किंवा एखादा जीवलग असेल, गुरू असेल वा निसर्ग. थोडक्यात तुमचं श्रद्धास्थान. एक अशी जागा ती तुमच्यासाठी बेहद्द आवश्यक आहे. तुम्ही जिथे पुर्णतः लीन असता, स्वतःला शुन्य समजता किंबहुना जिथे तुम्ही शुन्यच होऊन जाता. अशा श्रद्धास्थानासमोर उभे राहता मनातून फक्त "धन्यवाद" उमटतात अशी शक्ती देव.
तर म्हणत हे होते, की तुम्ही तुमच्या श्रद्धास्थानाला काही दिवसांसांठी मुर्तीरुपात बसवून 'तुझ्यामुळे सगळं व्यवस्थित आहे रे बाबा, असाच आशीर्वाद राहू देत' असे उत्सवरूपी आभार मानणार असाल तर त्यात गैर काहीच नाही. आभार व्यक्त करण्याइतकं शुद्ध, सुंदर काहीच नाही. पण...
                    ते करताना तुमच्या देवाच्या मुर्त्या सुपरमॅन, बुलेटवर बसून, स्कुटीवर बसून, डी जे नृत्य करणार्‍या, पतंग उडवणार्‍या अशा अनेक विचित्र रूपात साकाराला येतात (त्यांच्या विसर्जनाची दुर्दैवी कहाणी तर दरवर्षी व्हिडियो रुपात फिरत असतेच, त्याबद्दल बोलण्यात हशील नाही) हा कुठला प्रकार आहे नेमका ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याचा! तुमचे आभार, तुमची प्रार्थना निखळ शांत रुपात पोहोचती होते. तो ही जीवाचे कान करून तुमचं ऐकायलाच येतो. तुमच्यातली सर्वोत्तम सात्विक, बेहिशोबी, निर्मम अवस्था बघायला येतो. संसाराच्या व्यापात जिथे ह्या भावनेशी एकरूप होता येतच नाही, त्या एकरुपतेशी तुम्हाला जोडायला येतो.
तेव्हा त्याला ओंगळ रूप देऊन त्याच्यासमोर अक्राळ विक्राळ नाचण्यापेक्षा दोन्ही हात जोडून आतून"धन्यवाद" उमटू द्यावेत.  आपल्यातला साधेपणा संपला आणि "भक्तीचं फॅड" सुरू झालं. उलटा प्रवास करूया पुन्हा? त्याच्या साधेपणाशी आपल्या साधेपणाने जोडले जाऊया? त्याच्या साध्याशा रुपाशी आपण शांत मनाने जोडलं जाणं म्हणजे प्रार्थना, शब्दाविण पोहोचलेली प्रार्थना. तो फक्त अशा प्रार्थनेचा अभिलाषी, खरं तर तेच त्याच्या आणि आपल्यातलं इफेक्टीव्ह कम्यूनिकेशन! त्याला बोलावतोय म्हटल्यावर, त्याचा आबही राखण्याची जबाबदारी आपली असते, हे विसरून उपयोगाचं नाही.
-बागेश्री

 

Post a Comment

0 Comments