पडल्याजागीच चाचपडून पहावं
एखाद्याचं अस्तित्व
आपल्या आठवणीच्या गाभा-यात
आणि हात पोकळीत नुसताच फिरत रहावा..
जाणवू नयेत
ओळखीचे स्पर्श,
मखमली संदर्भ
कळावं
ह्या गाभा-यात आता नांदतो
फक्त गार काळोख...
तेव्हा घ्यावं समजून की
आपण पार झालोय वादळाच्या
अन् गाठलाय किनारा
जिथे होऊन उभाय हा मनगाभारा
एकटा....  शांत
निश्चल!
त्याच क्षणी
तेववून टाकावा
एक नंदादीप गाभा-यात
अन् मिणमिणू द्यावा सर्वत्र
हलका.. मऊ उजेड!
कोण जाणो
उद्या हाच होईल
वादळात वाट चुकल्या मुसाफिराना
किना-याची
दिशा दाखवणारा,
तटस्थ दीपस्तंभ!
-बागेश्री
 
 
 
 Posts
Posts
 
 
 
2 Comments
अगदी मोजक्या शब्दांत.... वेदांत सुत्रांसारखी ही तुझी प्रतिभा-संपन्नता आहे.वर्तमानच ओझं होत म्हणतात; हेच ते कोडगेपण....पण मग तो 'श्रांत, थंड, पोकळ'गाभारा कुठे स्थिरावला आहे? ब्रम्हांडाच्या अवकाशात नव्हे काय? बागेश्री, ही अध्यात्म यात्रा किती सहज स्पर्शी तू केली आहेस!ह्या वयात इतकी सखोल उतरते आहेस...धन्य आहेस.
ReplyDelete_/\_
ReplyDelete