मेणबत्ती

.... दुखा:च्या साधारण सातव्या स्तरावरून मी दुस-या स्तराकडे पाहिलं

     मी असं वरून खाली पाहिलं आणि तिथे उभ्या इसमाच्या डोळ्यात मला माझ्यापेक्षा जास्त दयनीय, सॅड टाईप्स भाव दिसले हो!! 'काहीतरी त्वरीत करायला हवे' ह्या भावनेतून मी घाईने एक दोरा माझ्या नाकात खुपसून अनेक शिंका काढल्या, आणि डोळ्यातून खळखळ पाणी आलं, चेहरा हवालदिल लालबुंद इत्यादी  झाला. आरशात पाहून मला माझी मस्त कीव आली, तेव्हा कुठे मी नि:श्वास सोडला. तो सोडत असताना  दुसर्‍या स्तरावरुन माझ्याकडे, एकटक मान उंच करून पाहणारा तो दयनीय मला अजूनच जास्त गरीब, बिचारा कसा वाटला ते मात्र देवाजीला माहित..
       परंतू मीही जिद्दी. लगोलग दृढ फर्म टाईप्स निश्चय केला की, प्राण इत्यादी गेले तरी चालतील मात्र असं वाकून वाकून खालच्या स्तरांकडे ढुंकूनही पहायचं नाही. आपण आपलं "सातव्या स्तराला शोभेल" असं दयनीय वर्तन ठेवायचं. जेणेकरून आठव्या स्तरावरील इसमाने आपल्याकडे वाकून पाहिलंच तर त्याला भरपूर  टेन्शन यायला हवं. मग काय! निश्चय म्हणजे निश्चय. मी माझं एक रुटीनच आखून घेतलं. दिन - रात फक्त दुखा:बद्दलच चर्चा करू लागलो. त्यातच रमू लागलो. माझ्या स्तरावरच्या दुःखेतर गोष्टी आता मला हाक वगैरे मारत नव्हत्या. मी माझ्या आत खोल खोल दयनीय  टोटल सॅड टाईप्सने उतरत गेलो. कितीही निश्चय केला तरी एक- दोन वेळेस माझं जरा खालच्या स्तराकडे लक्ष गेलंच (तेवढं चालतं!!). बरं ते बेट्टं शांत बसतं का? त्याची दुसऱ्या वरून तिसऱ्यावर येतानाची धडपड सुरु होती.  मला जाम धडकी भरली. 'अरे देवा, मी अजूनही सातव्यावरच' आणि तो खालचा विशेष प्राविण्य मिळवावं असा सरसर वर येतोय शिवाय दिवसेंदिवस अधिकच पिचलेला सुंदर वगैरेही दिसू लागला आहे. पुन्हा टेन्शन वाढलं आणि 'काहीतरी त्वरीत करायला हवे' ह्या भावनेतून मी पटकन स्तर क्रमांक आठकडे पाहिलं की, एका ढांगेत वर चढता आलं तर प्रश्नच मिटला. दु:ख प्रगतीची पुढची पायरी आता गाठलीच पाहिजे हा विचार मला रेस्टलेस टाईप्स करून गेला.
     
        तर..... "पहावे ते नवल" ह्या उक्तीप्रमाणे,  स्तर क्रमांक आठवरील बाब्या अगदी खुशालचेंडू! इथे- तिथे बागडत दुःखेतर गोष्टीत रमलेला, चक्क हसत वगैरेही होता! (?) अहो म्हणजे असं कधी असतं का? दुःखाचा स्तर काय, हा बावळट करतो काय? बरं नुसता हसतच नव्हता तर चक्क प्रसन्न फ्रेश टाईप्स दिसत होता हो! मला पुन्हा टेन्शन! हे म्हणजे मला दोन्हीकडून सततच टेन्शन! वरचा हसतो काय, खालचा दयनीय वगैरे दिसतोय काय! बरं त्यात वरचा माझ्याकडे पाहून हसत हसत म्हणतो कसा -
     "काय मालक खाली सगळं बरंय ना, काही लागलं तर सांगा हो बिंधास".  मीही सर्कास्टिक टाईप्स बोललोच (सोडतो काय?) "वरती बऱ्याच सुख सोयी दिसतात!!" तर हसता हसता म्हणतो काय पठ्ठ्या, की "कुठल्या स्तरावर नव्हत्या" आणि गेला निघून.... आईशपथ हा म्हणजे मला बुचकळा सिचुएशन टाईप्समधे टाकून गायब! शिवाय खालचं बेट्टं स्तर तीनवर पोचून सेटल बिटल झालेलं ! बरं आता तर भयानक गंभीर आणि रडवेलं वगैरेही दिसू लागलंय अचानक. स्वदु:खात मग्न टाईप्स..  हे म्हणजे माझं वर आड खाली विहीर टाईप झालं ना.. पण घाबरेल तो मी कसला.

मी ठरवलं पटापट प्रमोशन घेत सुटायचं, दु:खाच्या टॉप्मोस्ट थरावर पोहोचायचं. दु:ख नाही तर मजा नाही हो! रडगाणं गायला दु:खं नको? आणि खालचा सतत पिचलेला पहा, रडत रडत प्रमोशन मिळवतोच आहे ना?

मी आठव्याकडे पाहून "ओ शुक शुक, किती वर्षे आहात, आठव्यावरच? म्हणतो कसा -
"आठवत नाही! आणि मला वर जायचंच नाहीय. आयुष्याने ढक्कलपास करत इथे आणून सोडलं. पण मी खुष आहे. प्रमोशन वगैरे नको रे बाबा"
मी मनात म्हटलं "शी, शी, हा काय माणूस आहे? महत्वाकांक्षा वगैरे नाहीच, त्यापेक्षा खालचा बरा, झपाझप प्रगती करतो पठ्ठ्या" तर आठव्यावरचा पुन्हा मोठ्या आवाजात - "बरं मी जातो हो, खूप कामं पडलीत" दिलखुलास हसला पुन्हा.... मी पुन्हा गोंधळलो.

मी क्षणभर विचार केला (फक्त क्षणभरच हां!) की,
"अरे हे नेमकं चालंलय काय?"  खालचा खरा, की वरचा? की दोघेही  मुखवटे? मग हे स्तर कुठले? वर जाण्याची इर्षा कसली? का मी ह्याला दु:खाचेच स्तर समजतोय. सुख, दु:ख सोबतीने येणारे. त्यांना विभागणारी रेषाच धुसर, मग सगळं लक्ष दु:खाकडेच का जातं! असलेल्या सुखाकडे लक्षच जाऊ नये इतका दु:खाचा पगडा कसा?

स्वतःलाच कसून चार प्रश्न विचारता, कसं कुणास ठाऊक..  हलकं वाटू लागलं, भान आल्यासारखं. "हो रे, मी सुखीही आहे, अनेक इवले इवले आनंद आहेत की माझ्याकडे.. " म्हणता म्हणता दु:खेतर गोष्टींवर आपोआप नजर पडत गेली. एकाएकी लहान सहान प्रिय गोष्टी दिसल्या, जाणवल्या. "नाही रे नाही, हे केवळ दु:खांचे स्तर, निश्चितच नाहीत"  मघापासून, तो खालचा, हा वरचा ह्यात अडकून मी माझ्यापुढे पसरलेलं हे प्रसन्न आयुष्य पाहिलंच नाहीये. नकळत ओठांवर हसू आलं. एक श्वास भरून घेतला. आतून मोकळं वाटू लागलं... खूप सकारात्मकसुद्धा!

 तरीही खोडसाळ सवयीने खाली पाहिलंच पण नवल विषेश हे की तिथे कुणीही नव्हतं आणि डोक्यावरचाही गायब हो!

                 "सुख आहे, असतंच. आनंद आहे, जरा त्याच्याकडेही पाहू. स्वच्छ नजरेने पाहू"  फक्त क्षणिक आलेला हा विचार मेणबत्तीसारखा ठरला. एका विचाराने प्रकाशच प्रकाश पसरला, नकारात्मक अंधार पसार झाला... कधी कधी आयुष्यात सगळे व्याप दूर सारून, फक्त एकदाच, ही मेणबत्ती प्रखर पेटवा. तिच्यात अंधार पळवण्याची प्रचंड ताकद आहे....

-बागेश्री
     

Post a Comment

0 Comments