घर

एक फ्लॅट असतो. म्हणजे चार भिंती वर स्लॅब. नव्या को-या रंगाचा वास त्याच्या अंगाला. मग हळूच गृहप्रवेश. लाजरी, स्वप्नाने माखलेली पावलं उंब-यातून आत येतात. संसार थाटतात!  भिंतीवर खिळे बसतात. भिंतीला लागून वस्तू सजतात.  हळू- हळू भिंतीना वेगवेगळे आवाज,  त्यातले कढ, चढ, उतार सारे पाठ होतात. नव्या दमाची ताजी आणि जुनी जरा गंजलेली पण ताठ अशी सगळी माणसं भिंती ओळखू लागतात, एखाद- दोन रोपटी बाल्कनीत डोलू लागतात... नि फ्लॅट्चं घर होतं.
         काही वर्षांनी प्रत्येक वस्तू आपापल्या ठिकाणी घट्ट रोवून बसल्यासारखी भासू लागते, जणू काही आपल्याही आधी ह्या वस्तूच इथे ठाण मांडून असाव्यात. उलट त्यांच्या जराश्या जुनाट होण्याने घर मॅच्युर्ड वगैरे वाटू लागतं! जिव्हाळ्याची जागा होऊन बसतं. सहवासाने प्रेम वाढतं म्हणतात ते निर्जीव घराबाबत, त्यातल्या वस्तूंबाबतही रास्त वाटू लागतं....
                  नव्या घराने जरासं जुनं होणं ही प्रोसेस गम्मतशीर आहे. नेहमीच नाही का जुनी माणसंही, प्रेमळ अधिकाराची, जवळची, आपली वाटतात.
जुनं घरही असंच, नकळत कवेत घेतं गोंजारत राहतं..!

-बागेश्री 

Post a Comment

0 Comments