प्रसंग

तुझी परिचीत अनोळखी नजर
अंगावरून रांगत जाते
रंध्रा रंध्रातून थिजत
रक्ताच्या मुख्य प्रवाहात उतरते
आणि त्याच रक्ताचा मेंदूला पुरवठा होतो
इथवर ठीक आहे.
तोच प्रवाह हृदयाशी जातो तेव्हा
कळ उठते
डोळ्यांत वेेदना उमटते तेव्हा कुठेे
तुला माझी ओळख पटते!
हे असं घडताना एखादी कळ जीवघेणी ठरली,
माझ्याच डोळ्यांत तुझ्यासाठी अनोळखी भाव आले,
तर कसा झेलशील प्रसंग?
-बागेश्री

Post a Comment

0 Comments