आनंदी गोपाळ जोशी

आज आनंदी गोपाळ जोशी यांचा १५३ वा वाढदिवस....!!
एक लहानशी यमू. जिचं लग्न गोपाळरावांशी झालं. म्हणजे एका बिजवराशी. गोपाळरावांच्या पहिल्या बायकोला देवाज्ञा झाल्यावर वयाच्या साधारण पस्तीशीत त्यांचं लग्न ९ वर्षांच्या यमूशी लग्न झालं!
फारच विजोड जोडपं. ती अल्लड. नाजूक. लहानगी..  हे फारच बुद्धिमान, उच्चशिक्षित. राकट. वयाने थोर.
यमूला नहाण आल्यावर ती गोपाळरावांकडे आली.
तिच्या लहान सहान वागण्यातून तिच्या प्रखर बुद्धिमत्तेची जाणिव गोपाळरावांना झाली!
ही मुलगी शिकली पाहिजे. हिच्यावर उत्तम संस्कार झाले पाहिजेत असं त्यांच्या मनाने घेतलं आणि त्यांच्याकडे तिचं शिक्षण सुरू झालं.
अगदी अक्षरओळखीपासून ते वागण्या बोलण्यातल्या संस्कारापर्यंत शिकवणी सुरू झाली.
दिवसभर घरकाम आणि उरलेल्या वेळात शिक्षण! शेजार पाजार, घरातली माणसं सा-यांनी दोघांना वेड्यात काढलं.
पण तिने शिक्षणात कमालीची प्रगती दाखवली.
त्या प्रगतीने गोपाळरावांना हुरूप आला. तिला काय काय शिकवू, असे त्यांना झाले. अनेक लेखक, पुस्तके ती वाचू लागली.
हळू हळू गोपाळरावांच्या खांद्याला खांदा देऊन बौद्धिक खलबतं करू लागली!
छानसे लुगडे नेसून त्यांच्याबरोबर समुद्रावर फिरायला जाऊ लागली..
तिने बूट घातले म्हणून, नव-याबरोबर फिरायला जाते म्हणून लोक सज्ज्यांतून, खिडक्यांमधून अंगावर शेणाचं पाणी टाकयाचे. पण गोपाळरावांनी तिला समाज चौकटीच्या बाहेर नेले. त्या काळातल्या गंजलेल्या स्त्रियांपेक्षा वेगळी, आत्मविश्वास असलेली, स्वाभिमानी "आनंदी" त्यांनी घडवली.
तिचे शिक्षण अविरत सुरू ठेवले. त्यातुन एक उमदे व्यक्तिमत्व ते घडवत राहिले. फक्त पुस्तकी शिक्षण नाही तर तिच्या मनावर संस्कार करत राहिले.
दोघांत आधी घट्ट मैत्री आणि नंतर नवरा बायकोचे नाते फुलले.
आनंदीला दिवस गेल्यावर ती बाळाच्या सुखस्वप्नात रमली आणि गोपाळरावांची विलक्षण चिडचिड झाली. तिचे अभ्यासातले लक्ष उडाले म्हणून. ते किती तिला अभ्यासात गुंतवत, पण तिचे चित्तच था-यावर नसे. बाळ झाले. ती रमली. बाळ- संसार हेच तिचं विश्व झालं. आणि दुर्दैवाने एका आजारपणात ते बाळ गेले. बाळाच्या नावाने डोक्यावर बादलीभर पाणी ओतून घेऊन गोपाळरावांनी तिला दुसरे दिवशी अभ्यासाला बसवली जणू तिच्या प्रगतीतला एक अडसर नाहीसा झाला.
पुढे पदरचे पैसे मोडून तिला उच्चशिक्षणाकरता परदेशी पाठवली. तिथे गेल्यावर मात्र तिला गोपाळरावांचे विचार त्रोटक वाटू लागले- साहजिक होते- तिने आता जग पाहिले होते. गोपाळराव भारतातल्या कर्मठ, संकुचित विचारसरणीच्या समाजातच राहून गेले होते. ते तिथेच होते, ती उंच गेली होती! पण ती जिथे उभी होती, तिच्या पायांखाली शिडी होऊन गोपाळराव उभे होते, ही जाणिव तिने मनातून कधी पुसली नाही. त्यांच्याशी कायम घट्ट राहिली, विनम्र राहिली.
ती भारताची पहिली- वहिली डॉक्टर होऊन परत मायदेशी आली. दुर्दैवाने पुढे अल्पायुषी ठरली पण तिने त्या काळात, त्या विपरीत समाजव्यवस्थेतून बाहेर जाऊन "पहिली डॉक्टर" असण्याचा मान पटकवला...

विचार येतो,

यमूच्या आयुष्यात गोपाळराव नसते तर?
त्यांचा तो वेडा ध्यास नसता तर?
आनंदीनेही त्यांच्या वेडात स्वतःला असे झोकून दिले नसते तर?
.... तर इतिहास घडलाच नसता!

आज कुठे आपण स्त्री- पुरूष यांतील श्रेष्ठ कनिष्ठतेचा वाद करत बसतो..

दिडशे वर्षांपूर्वी त्या दोघांनी एकमेकांना अजोड साथ देत एक इतिहास घडवला. सगळं काही आपल्या मनात, विचारांत असतं.
"एकमेकांशिवाय दोघे अपूर्ण असतात" हे निसर्गाने अधोरेखित केलेलं सत्य आहे.
.. आणि ती अपूर्णता मान्य केली की पूर्णत्वाकडे जाता येतं, हे आनंदी- गोपाळ या जोडीने दाखवलेलं प्रात्यक्षिक.
 त्या जोडीला, त्यांच्या झपाटलेपणाला, अमूर्त ध्यासाला माझं त्रिवार वंदन.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments