तसं तर, कुणीच कुणाचं नसतं...

१.
बस भरलेली होती. मधल्या जागेत माणसे उन्हाने निथळत उभी होती.. पुढच्या थांब्याला चार पाच तरूणांसोबत एक म्हातारे गृहस्थ आत आले. बस घर्र घर्र करत आचके देत निघाली.  कसा-बसा बॅलॅन्स साधत आजोबा वरच्या कडीला धरून उभे राहिले. टिकिट काढले. महिलांसाठी आरक्षित खुर्चीतल्या बाईने सारे पाहिले. आजोबांना आपली सीट दिली.  आपले आठ महिन्यांचे पोट सुरक्षित राहिल अशा बेताने उभी राहिली. नुकती मिसरूड फुटू लागलेल्या एका मुलाला परिस्थितीचे भान आले. त्याने पटकन आपली खुर्ची गर्भारशीला दिली. मघाच्या आजोबांनी त्या मुलाची स्कूलबॅग आपल्या मांडीवर घेतली. तिघे अनोळखी ओळखीचे हसले.

तसं तर कुणीच कुणाचं नसतं....
-------------*****-----------------
२.
त्याला ऑफिस मधून निघायला रात्रीचे नऊ झाले. ट्रॅफिक पार करत घरी जायला कमीत कमी दीड तास तरी लागतो. म्हणून घाईने कार काढली. रस्त्याला लागला. एकाएकी जाणवलं. कडकडून भूक लागलीय. मिटींग्सच्या नादात दुपारी एक नंतर तोंडात काहीच टाकलेलं नाही. मग आठवलं डब्यात चटणी आणि घडीच्या पोळीचे मस्त दोन रोल्स आहेत. पण डबा मागच्या सीटवर. प्रयत्न करून पाहिला पण हात पोचला नाही. रस्त्यावर लक्ष एकाग्र केलं. एम. एम वरच्या गझलांमध्ये आज रोजच्यासारखे मनही रमेना.  तेवढ्यात एक लांबलचक सिग्नल लागला, पटकन सीट बेल्ट सोडला. झडप घालून मागच्या सीटवरचा डबा मिळवला. रोलचा घास घेणार इतक्यात डोळ्यांत भूक घेऊन एक पिटूकला काचेबाहेरून त्याच्याकडे पाहू लागला. त्याने काच खाली केली. एक रोल त्याला दिला. दोघेही खाऊ लागले.... 

तसं तर कुणीच कुणाचं नसतं....
-------------*****-----------------
३.

तिची पाठ आखडली होती.. घरगुती उपाय झाले. वैद्य झाले. पाठीचे दुखणे मानेत गेले. मान अडकलेला टेबलपंखा झाली. अधनं मधनं घेरीही येऊ लागली. शेवटी स्पेशालिस्ट कडे गेली. तब्बल महिना दीड महिन्यानंतर निदान झालं. योग्य उपचार मिळाला. मान सुटू लागली. येत्या गुरूवारी फॉलोअप आहे. तिला आठवलं. ३ महिन्यापूर्वी तिच्या कामवालीने अशाच दुखण्याकरता रजा घेतली. पण ती रजा वाढत गेली. कामवाली आली तेव्हा हिने तिच्यावर तोंड्सूख घेतले. आजही तिच्या बाईची मान अडकलेलीच आहे. गुरूवारी जाताना ती कामवालीला घेऊन गेली. आता दोघींचीही योग्य ट्रीटमेंट सुरू आहे.

तसं तर कुणीच कुणाचं नसतं....

-बागेश्री

Post a Comment

0 Comments