अमृत मुजूमदार!

अमृत मुजूमदार! आजही माझ्याडोळ्यापुढे लख्ख उभे आहेत. आहेत? छे नाही नाही, आहेत नव्हे  "आहे!". मधे ३० एक वर्षे गेलीत पण तो स्पष्ट आठवतो. वयाने बराच मोठा असला तरी आम्हा लहानग्यांचा  "अरे तुरे" प्रकारातला हक्काचा काका . तारवटल्या लाल डोळ्यांचा. रुबाबदार. डोईभर भरगच्च केस असणारा. अमृत काका.
    आयुष्यात त्याने एकच चूक केली. देशमुखांच्या वाड्यात बि-हाड थाटलं! घर कसंचं ते? बेसमेंटला चारही बाजूने बंद करून तयार झालेली एक दहा बाय दहाची खोली होती ती. नळाच्या बाजूची. म्हणजे त्या नळाला एक दिवसा- आड पाणी यायचं आणि देशमुखांच्या वाड्याला खच्चून जाग यायची. खुद्द देशमुख वगळता तिथे पाच बि-हाडे . नळावर पाणी भरताना भांडावेच लागते या जागतिक नियमाची कास धरून एरवी शहाणी वाटणारी, अडीनडीला एकमेकांसाठी धावून जाणारी बि-हाडे इथे कच खायची अन् पद्धतशीर वाद घालायची. शिवाय आम्ही कच्ची- बच्ची १२ मुलं. आई- वडीलांना मदत म्हणून पिटूकल्या बादल्या किंवा घागरी घेऊन पाण्याच्या रांगेत उभे राहून यथासांग गोंगाट करायचो. तरीही अमृत काका हूं की चूं न करता कसा गाढ निजलेला असायचा देव जाणे ! नळावरून पांगापांग होताना एखादे आजोबा अमृत काकाच्या खुराड्याचा दरवाजा ठोठवायचे आणि "पाणी भरून घे रेsssssss" अशी हाळी टाकून निघून जायचे.  आपले लाल- तांबडे डोळे घेऊन, पिंजारलेल्या केसांचे ते लुंगीबहद्दर वीर, तोंडात ब्रश कोंबून, स्टीलची बादली घेऊन पाणी भरायला जातानाचा अवतार आजही चांगला ध्यानात आहे.
            ....... तर हा अमृत काका पोटापाण्यासाठी काय करतो. कुठे जातो. त्याचे लग्न वगैरे झालेले आहे काय. या कशाशीही आमचा संबंध नव्हता. आम्हाला फक्त एक गणित ठावे होते की सकाळाची शाळा संपवून आम्ही घरी आलो आणि आमच्या मातांनी आमचे उदरभरण केले की आम्ही सारे काकाच्या दाराबाहेरच्या अंगणात खोखो, लंगडी, लगोरी इत्यादी खेळण्यास जमायचो.  हे अंगण पाणी भरण्याच्या आणि आमच्या लगोरीच्या लगबगीने पवित्र झालेली जागा आहे आणि ह्यावर फक्त आमचाच हक्क आहे, असे आम्ही त्यावेळी देशमुखांनाही ठणकून सांगितले असते, असे आज वाटते.

           आमचा सुरेख गलका सुरू असताना "मुले ही देवाघरची फुले" असे अजिबातच न वाटून घेण्या-या देशमुख आज्जी खणखणीत आवाजात, "घर- दार नाही का मेल्यांनो? चला पळा आपापल्या घरी.." अशा दरडावायच्या,  अगदी तेव्हाच खाडकन दार उघडून "खेळू द्या हो आज्जी, लेकरंच ती.  खेळतील तोवर त्यांच्या आयाही  घरातली चार कामे उरकून घेतील" अशी आमची बाजू सावरणारी "अमृतवाणी" व्ह्यायची! आज्जीही खमक्या आवाजात, "तूच्च लाडावून ठेवले आहेस ह्या धेडगुज-यांना" असा आमचा यथोचित सत्कार करून, पुन्हा वेताच्या खुर्चीत शिवीमाळ ओह्ह चुकले, जपमाळ ओढत बसत.
              आम्हाला अनायसे उघडे झालेले अमृतकाकाच्या खुराड्याचे दार मात्र एका अदभुत दुनियेची हाक असायची. खुराडे! खुराडे?? छे! ती तर एक कलाकाराची दुनिया होती. छोटासा पलंग. एक स्टिलची बादली. एक स्टोव्ह आणि २-३ भांडींचा तो संसार. पलंगावर बसताच आपल्या डोक्यावर डाव्या भिंतीपासून उजवीकडच्या भिंतीवर ठोकलेल्या खुंट्यांना बांधलेली नायलॉनच्या दोरी,  इन मीन चार कपड्यांच्या भाराने अकाली वाकून डोईवर आशीर्वाद द्यायची. बाकी फरशी दिसणारच नाही... इतकी सर्वत्र कागदं विखुरलेली. वृत्तपत्रांचे ढिगारे. मासिके. एका पेल्यामध्ये टोक काढून ठेवलेल्या पेन्सिली. पलंगावर म्हणू नका , स्टोव्ह जवळ म्हणू नका, अहो स्टील बादलीवरच्या झाकणावरही तुम्हांला खोडरबरांचे थोटके सापडतील! आणि त्या खोलीच्या ह्या अवताराला अगदी साजेसा, वायरच्या पिळाला लटकलेला, भक्क जळणारा पिवळ्या प्रकाशाचा सिक्स्टीचा बल्ब!!
              काकाने काढलेल्या शेकडो स्केचेससे आम्ही प्रामाणिक दर्दी प्रेक्षक!  ती चित्रे आम्ही कित्येक तास पहात बसलेलो आहोत. काय नसायचं त्यात? लहान बाळं, मोठ्या बायका, म्हातारे पुरूष. लोकांचा जमाव. उडणारे पक्षी, झोपलेले आजोबा एक ना अनेक.  ब-याच कागदांवर तर नुसते हात, किंवा पावलं. एखाद्या कागदावर फक्त डोळे. विविध प्रकारचे, पूर्ण उघडलेले, झाकलेले , मोठे- लहान- पिचके, डोळेच डोळे.  काही कागदांवर तर नुसत्या रेषा. आम्हाला कुठलीही कागदं घेऊन रेघोट्या ओढण्याची मुभा होती. खेळलेल्या मातीच्या हातांनी पाणी पिण्याची मुभा होती. काकांच्या डब्यामधून साखर, चिवडा खाण्याची मुभा होती. इतकंच काय तर पेन्सिलीला टोक काढताना तुटले तरी पुन्हा- पुन्हा टोक काढण्याची मुभा होती!!!

मला आठवतं, हळू- हळू ह्या काकावर आमचा इतका हक्क आम्ही दाखवू लागलो की कधी त्याने दरवाजा उघडला नाही,  तर त्याच्या खिडकीला बेधडक ढकलून आम्ही त्याला हाका मारायचो. एकदा तर त्याला कितीही हाका मारून जागच येईना तेव्हा लहान लहान खडे मारून त्याला जागे केल्याचीही आठवण आहे. आम्हा कलंदर मुलांवर न ओरडण्याचा संयम त्याने कुठे मिळवला असेल? शिवाय त्याने दार उघडाताच,  खिंडीदरवाजातून ताज्या दमाची शूर मावळ्यांची फळी आत शिरावी आणि गडाचा ताबा घ्यावा ह्या आवेशात आम्ही आत शिरायचो आणि त्याच आवेशात "दार उघडायला इतका कसा रे उशीssssर?" असा उलट प्रश्नही करायचो. तेव्हा "हे बघ मी रात्री काय काढलं?" म्हणत एक सुंदर रेखाचित्र तो आमच्या  हाती द्यायचा. आज कळतं ते चित्र कुठल्यातरी मासिकात, वृत्तपत्रात छापायला जाणार असायचं. ही अवली काट्टी चित्राचे तीन- तेरा वाजवतील का, अशी पुसट भितीही त्या माणासाच्या मनी नसायची!
             कधीतरी आमच्यापैकी कुणाचे आई किंवा वडील येऊन "नका रे त्या काकांना त्रास देऊ, कामं असतात त्याला" असे म्हणून सा-यांना घेऊन जायचे. आम्ही खट्टू मनाने घरी जायचो. मला आठवतं, त्याला आमची बि-हाडे जेवायला बोलवायची, अनेकदा "बाबारे एकटा जीव आहेस, ये छान जेवून जा" अमृतकाका मात्र हात जोडून विनम्रतेने नकार द्यायचा. त्याच्या घरी बहुतांश वेळा स्टोव्ह वर मुगाची खिचडीच रटरटत असायची!
आणि तो बल्बच्या प्रकाशात मान खाली घालून कागद पेन्सिलीशी तास न् तास रमायचा. आम्हालाही त्याने छंद लावला. रेघोट्या ओढण्याचा. आकार काढण्याचा. चित्रे काढण्याचा.
   आमच्यातली खेळण्याची रग तो आम्हाला चित्रे काढायला लावून जिरवी. आम्हाला अर्थातच काही विशेष कधी जमले नाही. पण आमच्या लीलांना लीलया पेलणारा, न वैतागणा-या काकाचा लळा मात्र खूप लागला. काकाला शेकडो प्रश्न विचारावीत आणि त्याने प्रत्येकाचं निरसन करावं हा आमच्यातला करार. खेळता खेळता अचानकच आमच्या कोणात भांडण जुंपायचं अन् मग मात्र त्याची त्रेधातिरपीट उडायची. वाद, भांडणे हे काही त्याला पेलायचं नाही.

                            पुढे पुढे आम्ही वरच्या वर्गात गेलो. अभ्यास वाढला. काकाकडे विशेष चक्कर पडली नाही तरी रविवार मात्र त्याच्याच खोलीत जायचा. मधे अनेक दिवस हा थेट गायब झाला! कुणी म्हणे अवली होता, गेला सोडून. कुणी म्हणे चित्रे काढून काय पोट भरतं, गेला असेल दुसरं काही करायला. कुणी म्हणे देश सोडून गेला. एक ना अनेक तर्क ऐकू आले. साधारण १५ दिवस उलटल्यावर,  देशमुख आज्जी "ऐसपैस दहा बाय दहाच्या खोलीकरता भाडेकरु हवा" अशी जाहिरात देऊन मोकळ्याही झाल्या. आम्हीही त्याच्या अचानक जाण्याने गोंधळलो होतो पण मनात ठाम विश्वास होता. की, काका येणार.
             महिना उलटला असावा. एके दिवशी हातात ट्रंक घेऊन काका मागोमाग चक्क काकू आली!  तिचं देशमुख वाड्यानं त्याच्या शिरस्त्याने स्वागतही  केलं. ओट्या भरल्या. पंगती झाल्या. आपल्या कजाग आणि व्यवहारी स्वभावाला धरून देशमुख आजीने प्रामाणिकपणे भाडेवाढही मागितली.  अमृतकाकांना परवडत नसावे. कशीबशी बेताची भाडेवाढ ठरली. आज्जी नाखुषीने मिळेल तेवढी वाढ घेऊन गप राहिली. दिवस उलटू लागले तसे अमृतकाकू देशमु़ख वाड्यात छान रुळली. नेमाने नळावर पाण्याला येऊ लागली. बिचारी भांडत मात्र कधीच नसे.
               खरं सांगायचं तर,  आम्हांला सुरूवातीला काकू काही विशेष आवडली नाही. म्हणजे ती वाईट वगैरे नव्हती पण आमच्या हक्काच्या जागेवर तिस-याच कुणीतरी हा असा आगंतुक केलेला शिरकाव आम्हाला काही रूचला नाही. बरं एवढ्यावर निभावतं, तरी ठीक. इथे पहावं तर काका- काकूत जरा जास्तच गट्टी! काकाची चित्रे आमच्याआधी तिच्या हाती जाऊ लागली. तीही बरीच कौतुक वगैरे करत असेल. आम्ही लहानगे आपले  "वा काका, कित्ती छान" इत्यादीच्या वर न जाणारे. ती मात्र बराच वेळ चित्रांत काय पहात राही कोण जाणे! आणि ती आम्हाला खूपण्याचे दुसरे मोठ्ठे कारण हे की, काकाची खोली गरजेपेक्षा जास्त स्वच्छ राहू लागली!! सगळी कागदे एकावर एक रचलेली. खोडरबरे एका वाटीत. पेन्सिलीचा कुठे म्हणून कचरा नाही. नायलॉनची दोरी आशीर्वाद देईनाशी झाली. काका उगाच स्वच्छ वगैरे दिसू लागला. शिवाय काका चित्रे काढताना ही पण काढायला बसे!! बाकी तिची बोटे लांब निमूळती छान. तशी ती स्वभावाने वाईट नव्हती असेच म्हणूया, नाहीतर आम्ही येताच आमच्या हातावर काही बाही का ठेवले असते? नवा पदार्थ केल्यास आग्रहाने खाऊ का घातले असते. फार बोलकी नव्हती तशी. पण जितके बोलायची ते फार जिव्हाळ्याने असायचे.. वाड्यातल्या बायकांच्या गप्पाष्टकांपेक्षा तिला चित्रांतच रमायला आवडायचं. हे एकूणात असं नवं समीकरण होतं.  बाकी, आम्हां मुलांना दह्याचे विरजण मागून आणायला, एक घर वाढले, एवढे खरे.

             सालाबादाप्रमाणे, देशमुख आज्जी सगळ्या भाडेकरूंकडून भाडेवाढ घेई. ती मागणी बरेचदा अवास्तव असे. मग सारे कुटूंब एकत्र येऊन बोलणी करत व अमूक एक आकडा वाढ म्हणून स्विकारली जाई. ती वाढ मनासारखी नसल्याने पुढे अनेक दिवस आज्जी धुसमूसत राही. एके दिवशी आज्जीच्या गलक्याने सारी बि-हाडं खाली उतरली. तिन्ही सांजेची वेळ. जो तो आपापल्या घरी काही- बाही करत होता, हातचे सोडून सारे धावले, म्हातारीला काही झाले की काय अशी सा-यांना भिती. पाहिले तर पुढ्यात अमृतकाकू नी आज्जी तिला बोल बोल बोलतेय. आज्जीच्या घरातून काहितरी गहाळ झाले होते नि मोलकरणी व्यतिरिक्त काकूच घरात येऊन गेली होती. मोलकरीण गेले १७ वर्षे आज्जीकडे काम करतेय, ती कशी आगळिक करेल! तेव्हा ऐवज लंपास करणारी काकूच, अशा खात्रीने तिचा रीतसर पाणउतारा सुरू होता. सगळ्यांच्या मध्यस्थीने ते प्रकरण शांत झालं. परंतू त्यानंतर दोन दिवस तो वाडा शांत शांत होता. मावळेही गार होते.
                            पण काकाशिवाय करमेल ते त्याचे मावळे कसले!! रविवारी नेमाने काकाच्या घरी हजेरी लागलीच. पाहिलं तर हे दोघे सामानाची बांधाबांध करताना दिसले. खबर वायूवेगाने सा-या बि-हाड्यांतून फिरली. बघता- बघता एकूण एक बि-हाडकरू तिथे दाखल झाला. एक आज्जी वगळता! सा-यांच्या लेखी आजीचे वागणे फार मनाला लावून घेण्यासारखे नव्हते. घर मिळणे, बस्तान बसवणे सोपे नव्हते. तेव्हा झाल्या प्रकरणाला इतक्या जिव्हारी लावून घेऊ नकोस, असे परोपरी सारे त्याला सांगू लागले. पण काहीच फरक पडला नाही. दुखावलेले जीव मुकपणे सामान बांधत राहिले. तासाभरात  खोली ओकी बोकी झाली. सगळा संसार चार पिशव्यांत आला. आम्ही तर फार सैरभैर झालो, हा काका आम्हाला सोडून जाऊ शकतो हेच आम्हाला पटण्यासारखे नव्हते. त्याच्या त्या छोट्याश्या खोलीत आमचं काय काय नव्हतं? बालपण होतं, त्याने जपलेलं. हळूवार जपलेलं बालपण. त्याच्या प्रत्येक कागदाला लपेटलेलं. त्याच्या चित्रांतून उमटलेलं. तिनेही काही काळातच आम्हाला लळा लावला होता. तिच्या प्रत्येक डब्यांवर आमच्या बोटांचे ठसे होते. ते सगळं गुंडाळून दोघे निघाली. तिच्या अवमानाने दुखावलेली, स्वतःच्या स्वभावाला धरून वाद- विवाद न करता, आज्जीला एकही प्रश्न न करता! दोघेही निघाली. सगळ्यांचा त्यांनी मुक निरोप घेतला. सारी हळहळली. आम्ही पोरं काकाला बिलगलो. डोळ्यांत पाणी आणून आमचे डोळे पुसून तो निघाला. तो गेला. वाडा अजूनच शांत करून गेला.

आज्जीने न चुकता दुसरे दिवशी  "ऐसपैस दहा बाय दहाच्या खोलीकरता भाडेकरु हवा" जाहिरात दिली.
                कुणी म्हणाले, अमॄत पुन्हा एकदा भाडेवाढ देऊ शकला नाही म्हणून आज्जीने कांगावा केला, कुणी म्हणाले आज-काल कुणाचा भरवसा नाही. चांगले दिसणारेही चोरी- मारी करतात. कुणी काय, तर कुणी काय. वाडा कित्येक दिवस कुजबूजत राहिला!
           आम्ही मुलं अंगणातून वर येताना काकाची बंद खोली पहायचो. पिळाला लटकलेला बल्ब खिडकीतून दिसायचा. स्टोव्ह ठेवलेल्या कोपर्‍यात भिंतीवरचा तेलकट काळा डाग तेवढीच त्याच्या अस्तित्वाची खुण!
                               
           माझ्याकडे एक स्केच आहे, माझ्या बालपणीचं. लहानग्या डोळ्यांत पुरेपुर निरागस भाव असलेले चित्र. निरागसता टिपणं, ती टिपून चित्रात हुबेहुब उतरवणं हे सोपं नाही. त्याकरता चित्रकाराचं मन- हृदय अपार संवेदनशील असावं लागतं. त्याच्या कुंचल्यात ती जादू  असावी लागते. अशा संवेदनशील मनाला समजून न घेऊ शकणारे लोक खरे अभागी. आणि अशा मनाशी जोडले गेलेले लोक, ख-या अर्थाने समृद्ध!  बालपण समृद्ध करणारी ती "अमृत" अशी चित्राखालची सही मला निरंतर सोबत करणार आहे....

-Bageshree

Post a Comment

0 Comments