या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं

१.

दरवर्षी सर्व तुकड्यांमधून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शाळा पुढील वर्षाच्या सातही विषयांची पाठ्यपुस्तके, सात २०० पानी, सात १०० पानी वह्या बक्षीस म्हणून देत असे. तिच्या छोट्या हातात ते बक्षीस मावायचंही नाही. वर्ष बदलायचं पण हिचा पहिला नंबर चुकायचा नाही.  
तिच्या बाबांनी सांगून ठेवल्याप्रमाणे शिंदे सर एक मुलगी हेरून ठेवायचे. जिला शाळेचा खर्च परवडणारा नसायचा. पहिला क्रमांकाचा गौरव मोजून पाच मिनिटे मिरवला की ते बक्षीस सर म्हणतील त्या आपल्या वर्गमैत्रिणीला देऊन ही बाबांचे बोट धरून घरी यायची.
               एकेवर्षी दुपारी लेक निजल्यावर कौतुकाने तिच्या चेह-यावर हात फिरवून आई म्हणाली, एकदाही पोरीला बक्षीस घरी आणू देत नाहीत. बाबा म्हणाले, अगं हिचा शाळा खर्च मी करू शकतो, देवाने तेवढं दिलंय आपल्याला. तू एकदा नव्या को-या पुस्तकांना हातात धरणारी मुलं बघायला हवीस. त्यांचा फुललेला चेहरा पहायला हवास. शिवाय आपल्या लेकीला आतापासून कळायला हवं. गरजेपेक्षा अधिक मिळालं की त्याची हाव नाही धरायची. ते सत्पात्री दान करायचं.

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं
---------------******-----------------
२.

तो इंजिनिअर झाला. रग्गड कमावू लागला. त्याच्या हातात कला होती. कागदाला पेन्सिल टेकवली की उत्तमातून उत्तम चित्रे काढी. प्रमाणबद्धता, रंग, सौंदर्य अव्वल उतरे. तो कधीही चित्रकला शिकला नव्हता. पण त्याची चित्रे भल्याभल्यांना आवडून जात. लोकांना वाटे जादू आहे बोटांत. कुणीही त्याच्या घरी आले,  की भारंभार चित्रातले एखादे बेधडक उचलून "हे मी नेऊ?' विचारून घेऊनही जात. त्याचे एक्सिबिशन खच्चून भरे. दोन वर्षाकाठी एखादे प्रदर्शन पण लोक कौतुकाने येऊन चित्रे विकत घेत. आलेला सगळा पैसा त्याने कधी कुणाला कधी कुणाला वाटून टाकला. कारण विचारल्यावर सांगायचा, आई म्हणायची, तू इंजिनिअरिंग शिकून नव्हता आलेलास. खपलास, जागलास, मेहनत केलीस तेव्हा कुठे ती पदवी मिळाली. पदवीने पुरेसा पैसा दिला. चित्रकला मात्र देवाच्या घरून घेऊन आलास. ते तुझं मिळकतीचं नाही, ते तुझ्या आनंदाचं साधन. त्यातून मिळालेलं, ठेऊन काय करशील?

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं
---------------******-----------------
३.

ती लहान भावावर जवळजवळ खेकसत म्हणाली, तू पहिले तुझ्या अभ्यासाचं बघ! दरवर्षी कमी मार्क्स. परिक्षेच्या काळात रायटर म्हणून जातोस. आधी स्वतः उत्तम मार्क मिळव मग दुस-यांचा रायटर हो. त्याने गुमान मान खाली घातली. अभ्यास करत बसला. ताई निजल्यावर अलार्म बदलून ५ चा केला. पेपरच्या आधी अर्धातास हा सेंटरवर पोचला नाही की, तो याची वाट पहात सैरभैर होतो. ब्रेललिपीवरची त्याची बोटे टेन्शनने थरथरतात. ऐनवेळी रायटर आलाच नाही तर? या विचाराने केलेला अभ्यास विसरायला होतो. हे आता ह्याला ठाऊक झालं होतं. दरवर्षी कुणा नव्या अंध विद्यार्थ्याचा हा रायटर म्हणून जायचा. याला स्वतःला ४ मार्क कमी आले तरी समाधान खूप मिळायचं. त्याने ताईला एक दोन वेळेस सांगून पाहिलं, तू ही करून पहा. आपले डोळे फक्त ३ तास कुणासाठी वापरल्याने त्याचा विषय निघतो, तो वरच्या वर्गात जातो तेव्हा काय भारी वाटतं एकदा अनुभवून पहा..

या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत रहावं
-बागेश्री






  

Post a Comment

0 Comments