जाणिवेची दलदल

नाती वरवर जितकी साधी सोपी वाटतात. तितकी आत गुंतागुंतीची असतात. हे अनेकदा अनुभवायला येते. घट्ट विण एकाएकी उसवलेली दिसते. आपण आश्चर्य करतो. आपल्याला कायम वरून घट्ट वाटत/ दिसत आलेले असते नाते, मग ताट्कन कसे उसवले? यावर विचार करत राहिले. जितका सखोल विचार केला, तितकी गुंतागुंतीच्या निबिड अरण्यात शिरत गेले. ताड ताड चालत राहिले. कुठल्याशा क्षणी दलदलीत पाय पडला. भुलाव्याची दलदल. देखाव्याची दलदल. आकलन झालं. हेच ते मूळ. जमिनीसारखी भासणारी, पोटात मात्र भुसभूशीत असणारी, दलदल! 
                   आयुष्याचा भला मोठा टप्पा पार करायचाय तेव्हा, नाती सांभाळावीच लागतात. या एका समीकरणावर आपण जगण्याचा डोलारा उभा करतो. नाती जोडली जाताना ती आपलीशी व्हावी, आयुष्यभर टिकावी म्हणून आपण काय करत नाही? स्वतःला विचारण्याजोगा प्रश्न आहे हा. नाते आपले आहे, हे जाणवेपर्यंत आपण त्या माणसाच्या मनाला भावेल अशी प्रत्येक गोष्ट करतो. त्यातल्या कैक आपल्याला पटत नसतात. पण जी व्यक्ती आपल्याला हवीशी त्या व्यक्तीकरता आपण आपले मन मारतो. प्रसंगी आवडी. प्रसंगी इच्छा. प्रसंगी तत्त्व. जे जे दाबून टाकतो. त्याची दलदल तयार होत असते. आत आत. कधीतरी ते नाते स्वीकृती देते. म्हणजे तसे ते म्हणते. पण बरेचदा असे होते की, त्या नात्याने स्वीकृती दिली तरी आपल्या आतून एक जाणीव येत राहते. समथिंग इज "स्टील" मिसिंग. नाते आपले आहे, हा फक्त भास आपल्याला देऊ केलाय. असा आतला आवाज येतो. पण त्या जाणिवेचं आपण काय करतो. तिची कॉलर पकडतो. तिला दलदलीत टाकतो. नात्यासाठी झटणे मात्र सुटत नाही. थांबत नाही. एकातून एक अशी नात्यांची गुंफण अविरत करत जातो. 
                   कधीतरी प्रसंग येतो. परिक्षा होतेच. या जगण्याची ही मोठी गंमत आहे. डोळे उघडणारी वीज तो वर बसलेला नक्की पाडून जातो. आणि काय त्या वीजेचे तेज. सगळे लख्ख दिसू लागते. आतला आवाज नव्हताच खोटा. नाती उघडी पडतात. आपण त्यांना धरून ठेवली तो आपला अट्टहास होता, ही जाणीव देऊन लोपते ती वीज. आपण दिपलेले डोळे उघडतो तेव्हा दलदलीत उभे असतो. धसत धसत. आता स्व- हिमतीवरच बाहेर यावे लागते. पोळून निघाल्यावर सावध पावले पडण्याची सोय असते ही.
               आपले आधार विचार करून बांधावेत. अधेमधे तपासून पहावेत. मनाचा तळ स्वच्छ राखायला मदत होते. आतल्या आवाजाशी मैत्री करावी. त्याच्या ताकदीवर लांबचा पल्ला गाठता येतो.
-बागेश्री

Post a Comment

0 Comments