तुला ठाऊक होतं ना कान्हा

तुला ठाऊक होतं ना कान्हा
आज गोकुळाबाहेर पडणा-या
पावलांना पुन्हा वळून येता येणार नाही...
हे गोकूळ पुन्हा दिसणार नाही
ही राधा पुन्हा दिसणार नाही....
तुला माया लावलेली
तू माया लावलेली
गाई गुरं वासरं
गोप गोपिका, त्यांची घरं
नजरेस पडणार नाहीत, ठाऊक होतं तुला.
म्हणूनच लांब निघून गेल्यावर
वळून मागे पाहिल्यावर
तुझ्या डोळ्यांत दिसली 
डबडबलेली अथांग यमुना
तेव्हा तुझ्या आत आत
काहीतरी तुटत होतं
वाटलं जितकं सहज तितकं
गोकुळ काही सुटत नव्हतं... 

तुझ्या राजस पावलांना
फक्त पुढेच जाण्याचाच शाप होता, मुकुंदा...
जनपद जवळ करताना
पांडव आपले म्हणताना
चुलत्यांकडून चुलत्यांना
न्याय मिळवून देताना
गादी तुझी नव्हती
पद तुझं नव्हतं
हक्क गाजवावा असं
गोकुळ उरलं नव्हतं..
राजकारणी, धुरंधर
वासुदेव होत जाताना
आत आत उमलत राहिलं होतं का रे
तुझं गोकुळ तुझ्या?

का अट्टहासाने
वागवलेस मोरपीस
टिकवलीस बासरी
टाकली नाहीस गळ्यातली
वैजयंती, कधीही?
खरं सांग कान्हा
तुझ्या एकटेपणात तू 
कायम उगाळत राहिला होतास ना रे,
तुझ्यातलं राधेपण?
-बागेश्री

Post a Comment

1 Comments