#bookmark #selfgift
बरेचदा कुणाला काय गिफ्ट द्यावे हा प्रश्न पडतो.. आणि चार चार दिवस विचार केल्यानंतर वैतागून 'आजकाल सगळ्यांकडे सगळंच असतं', या अतरंगी निष्कर्षाशीही आपण पोहोचतो. तरीदेखील आपल्या लाडक्या माणसांना कलात्मक भेटवस्तू द्यावी ही इच्छा गप्प बसू देत नाही...
तर काल परवा स्वतःलाच काहीतरी गिफ्ट द्यावे या विचाराची झिंग मला आली. Self Love म्हणा self indulgence म्हणा! काहीतरी आपणच आपल्याला देवून टाकावे भन्नाट आणि खूषच करून टाकावे, हा विचार मला अजिबात स्वस्थ बसू देईना. एव्हाना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे स्वतःला गिफ्ट देताना वरच्या अतरंगी निष्कर्षाच्या जवळपासही पोहोचत नसतो आपण. उलट यादी मोठी तरीही स्पष्ट असल्याने सर्व कल्पनाशक्ती फक्त आत्ता 'नेमके' काय घ्यावे, यापाशी एकवटते!
लॉकडाऊनने लावलेल्या सवयीनुसार शॉपिंग म्हणजे ऑनलाइन हे शरीराच्या इतर नैसर्गिक हालचालीइतकं सहज समीकरण झाल्याने लॅपटॉप उघडून बसले. आणि काय घेऊया हा प्रश्न मनात येण्याआधी समोर नुकत्याच घेतलेल्या पुस्तकांची चळत दिसली. दरवेळी पुस्तक वाचत असताना, ते मिटून ठेवण्याची वेळ आली की "एक बुकमार्क हवाय छान आपल्याला" या विचाराचे शिक्कामोर्तब मी कैक वेळा केले आहे. हे सगळे डोक्यात सुरू असेस्तोवर बोटांनी "बुकमार्क" शब्द टाईप करूनही टाकला होता आणि डोळ्यासमोर आलेला पहिला पर्याय हा. पुस्तकात ठेवून ठेवून जाळी पडलेलं पान...!
केवढी सुबक कल्पना. मी केवढीतरी मागे खेचले गेले. शाळा कॉलेजचे स्वतःला पैलू पाडण्याचे दिवस. त्यात अखंड केलेलं वाचन आणि तेव्हा बुकमार्क म्हणून वापरलेलं पिंपळाचं खरंखुरं पान. या पुस्तकातून त्या पुस्तकात ते दिमाखदार मिरवायचं. रोज आळुमाळू स्वतःवर जाळी कोरून घ्यायचं. कधी कुठे मुडपलं, हातून जरा निसटलं तर मात्र चुकीला माफी नाही. जाळीच्या नक्षीचा चुरा होऊन तिथे छिद्र तयार व्हायचं. आपल्या हातून उगाच गालबोट लागलं म्हणून मन हळहळायचं. अगदी अशा चुकीसकट तयार केलेला हा बुकमार्क मला ऍमेझॉनवर सापडला. याच्या निर्मात्याचं मनोमन कौतुक करत मी तो बुक केला आणि आज हा हाती पडला.
यावर एक जास्तीची गोष्ट आहे. तो म्हणजे हा लालपाठीचा काळ्या ठिपक्यांचा किडा! झाडाखाली बसून कधी पुस्तक वाचत असाल तर हा स्वतःची देखणी उपस्थिती लावत डोळ्यांपुढे न आला तर नवल... तूर्तास तरी हा किडा म्हणजे निश्चितच मी आहे! माझ्या घरातल्या पुस्तकांना लागलेला... 😃🐞
0 Comments