अचानक
मनाच्या बंद पायवाटांंवर चाहूल उठते,
पावलं वाजतात
'भास असावा कदाचित'
आपण दुर्लक्ष करणार असतो
पण स्वस्थ बसू देत नाही
खोडून टाकल्या भूतकाळाच्या
मिटत चालल्या पायवाटेवर उठलेली,
ती चाहूल...!
लांबवर उठलेली ती पावलं
आपल्या दिशेने येऊ लागतात
आवाज स्पष्ट अगदी स्पष्ट होत जातो
आणि तरीही
संपलेला नसतो
आपल्यातला चिवट आशावाद
ती पावलं येतील,
आपल्याला ओलांडून
पलीकडे नाहीशी होतील
त्यांचा आपला संबंध
उरला आहे कोठे..?
आपण घेत राहतो
नुसताच कानोसा..
आणि धसकतो जरासे
ती पावलं आपल्याशीच
आपल्या पाठीमागे येऊन उभी!
न डगमगता
उद्दाम, निश्चल स्थिर उभी
ती पावलं
आलेली असतात
आपलीच गाठ- भेट घ्यायला
राहून गेलेलं काहीतरी
हक्काने पूर्ण करायला!
परवानगी न घेता निघून गेलेली
विनापरवाना येऊ पाहतात तेव्हा
आपल्या
भावविश्वात डोकावण्याचा
त्यांना किती अधिकार द्यायचा
हे मात्र आपणच ठरवायचं!
-बागेश्री
0 Comments