मराठवाडा मुक्तिसंग्राम

भारत स्वतंत्र झाला. फाळणी झाली. फाळणीने, "डायरेक्ट अ‍ॅक्शन डे" ने माणसांचा माणसांवरील विश्वास उडवला. बॉर्डरलगत कुरुक्षेत्र उभं राहिलं. आपले परके भेदाभेद उरला नाही. महाभारतातल्या यादवी माजणेचा अर्थ तिथे प्रत्यक्षात उभा राहिला. प्रेतांना उपसण्यासाठी जिवंत माणसे शोधावी लागली. स्वातंत्र्य संग्रामापेक्षा खोल जखमा स्वातंत्र्य मिळण्याच्या प्रक्रियेने दिल्या. भारत- पाकिस्तान, गांधी-  जिन्नाह, नेहरू- वल्लभभाई सारे भविष्याला इतिहासाची साक्ष देण्यासाठी तो संग्राम पहात राहिले. दोन देश दोन दिशांना वळून बसले. पाठीला पाठ लावून. हळू - हळू ओल्या जखमांच्या जागा व्रणाने घेतल्या. स्वातंत्र्याचं पहिलं वर्ष या अशा रणधुमाळीचं, रक्तपाताचं. आपण मुक्त झालो आहो हा आनंद पहिल्या १५ ऑगस्टपर्यंत लोकांमधे झिरपला होता की नाही शंका वाटते. भारतभर पहिला स्वातंत्र्यदिन साजरा होताना मात्र भारत्याच्या पोटातलं हैद्राबाद संस्थान निजामाच्याच ताब्यात होतं. तिथे तिरंगा फडकावयाला काय त्याचा उच्चार करणंही गुन्हा होता. ब्रिटिश हटले, निजाम मात्र पाय खोवून होता. स्वातंत्र्य मिळवण्याची झिंग मराठवाड्याच्या आतून धडका मारू लागली. रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांनी लोकांमधे आग चेतवली. बाहेर काय भोगून झाले आहे ठाऊक असले तरी निजामापासून मुक्ती हवीच होती. आतल्या हालचाली वाढल्या तशी उद्दाम निजामाने दडपशाही केली. तो चिवट होता हे निश्चित. आतला आवाज आतच दाबायची त्यांची जुनी सवय होती. पण आता गणित बदललं होतं. भारताला स्वातंत्र्यातला सराईतपणा कळू लागला होता. आपल्या हक्कांची जाणिव होतीच. अधिकाराचीही झाली होती. मराठवाड्याला बाहेरून मदत आली. वल्लभभाईंनी कामगिरी केली.  १३ सप्टेंबर १९४८. सर्जिकल स्ट्राईक! पहाटे ४ चा सुमार. मुख्य फौजा सोलापुरातून शिरल्या. पाहता पहता दोन तासात नळदुर्ग तुळजापूर तर संध्याकाळपर्यंत परभणी, विजयवाडा ताब्यात घेतलं. तिकडे काही कुमक चाळीसगावकडून घुसली. दौलताबाद काबीज झाले. बुलडाण्याकडून आत शिरलेल्या सैन्याने जालना बळकावले. दोन दिवसात औरंगाबाद पडले तसा निजाम पुरता हलला. आता अजून लढत राहिलो तर सत्ताधीश म्हणून नाक तर कापले जाईलच पण आत मुस्कटदाबी करून बसवलेल्यांच्या हाती लागलो तर धडगत नाही कळून निजामाला शहाणपण सुचलं. तो भारतीय लष्कराला शरण गेला. हात जोडून वल्लभभाईंना घेऊन टाका संस्थान माझी मात्र अब्रू राखू द्या म्हणाला. हीच ती आजची तारीख १७ सप्टेंबरची. याच दिवशी, १९४८ मधे पहिल्यांदा मराठवाड्याने तिरंगा पाहिला. लोक अंगाखांद्यावर तिरंगा मिरवत रस्त्यांवर येऊन नाचले. भारत आतून अखंड झाला!

आज मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅपवर मिळाली आणि मनात हे सगळं असं येत गेलं....  

-बागेश्री

Post a Comment

0 Comments