समर्पण

काही नाती अनुभवावीच लागतात तर त्यातल्या प्रत्येक भावनांची छटा अंगावर घेता येते, अंतरबाह्य माखता येतं!

जसं लेकरू असल्याशिवाय आईपण कळत नाही, ते कळण्यासाठी त्या नात्यात प्रत्यक्षात शिरून त्यातल्या प्रत्येक धाग्याची प्रत्येक वीण हळुवार गुंफता येते. त्या वीणीचा पोत कळतो...

आयुष्यात एखाद्या वेळी, एका क्षणी एक व्यक्ती असा हात देते, की आपल्याला एकाएकी प्रेमाचा अर्थ कळतो. नुसता वरवर नाही. तर पुरेपूर आतला. 

खोल, गाढ छटांचा. शब्दांत सांगता येणार नाही असा गर्भ. सुदैवाने असं लख्ख नातं पदरात पडलं की त्याची प्रत्येक छटा समरसून जगून घ्यावी. आणि तेव्हाच त्यात आपल्या हातचे काहीही राखून न ठेवता सपशेल समर्पण करून टाकावं!

त्यावेळी समर्पण नेमकं असतं काय, त्यात आपण दिसतो कसे, उठतो बसतो कसे मुळात आपण नेमके आहोत कसे याची उकल होते कारण हीच आयुष्याची समाधी अवस्था, स्वतःबाहेर उभं राहून स्वतःकडे बघता येण्यासारखी निर्मम अवस्था..

अशा नात्यात समर्पित व्यक्तीचा पारदर्शीपणा कुठल्याही वाहत्या नदीच्या पात्रापेक्षा कैक पटीने अधिक नितळ असतो. 


आकंठ प्रेमात पडून स्व गमावून टाकल्याशिवाय कुणीच आपल्याला या अवस्थेला नेऊ शकत नाही. तिथे असणं अवर्णनीय आहे. हा अनुभव न घेता संपलो तर मनुष्य जन्मांतल्या अपूर्वाईला न गाठताच निघून गेलो असं होईल.   

त्यामुळेच

संतांनी घेतलेलं विठूरायाचं वेड, राधेला झालेली कृष्णाची बाधा, मीरेने मनोमन कृष्णाला अर्पण केलेला जन्म वा पारो- देवदास, हीर- रांझा किंवा आजच्या जगण्यात आपल्या भोवताली एकमेकांचा ध्यास घेतलेले प्रेमिक, न चुकता वारीला जाणारे वारकरी, जगापासून तुटून ज्याच्यावर प्रेम करतोय त्यालाच विश्व मानलेली माणसे नक्कीच अनुभवाच्या मौलिक सागरातले माणिक- मोती आपल्या आयुष्याशी जोडत चाललेले असतात... त्यांनाच कळून आलेलं असतं समर्पण म्हणजे एकमेव अशी जागा जिथे "मी" पण गळून पडतं, स्वतःचं खरंखुरं, खोटेपणाचा कुठलाही मुलामा नसलेलं  ऑथेंटिक रुप आपल्याला पहायला मिळतं... म्हणूनच वाटतं, स्व- शोधाचं ध्येय समर्पणाची वाट घेतल्यावाचून पुर्णत्वाला जाऊ शकत नाही!

-बागेश्री


Post a Comment

0 Comments