आठवणींच्या मेंदूला मुंग्या

      बाहेर तुंबाड सिनेमात पडतो तसा एकसूरी अखंड पाऊस पडतोय आणि त्याच्या तालानं मला घरात मिटल्या डोळ्यानं तंद्री लागत चाललीय. आता नेहमीच्या अनुभवाप्रमाणे आठवणींच्या वारूळातून भसभसा मुंग्या बाहेर पडतील, माझी खात्री होतेय. परंतु मला आत्ता या क्षणी ते घडून नकोय म्हणून मी गोलाकार स्टिकर्स वारूळाच्या प्रत्येक छिद्राला लावून ते तात्पुरतं बंद करणारंय. कावळा चिमणीच्या पारंपारिक गोष्टीवरून शहाणे होऊन मुंग्यानीही पावसाळ्यात टिकणारं मेणाचं वारूळ बांधलं असावं अशी माझी धारणा आहे. म्हणून मी स्टिकर्स पटापट चिकटवत चालले आहे. एकेक छिद्र बंद होतंय तसा माझा आनंद, समाधान होऊन माझ्या तंद्रीत मिसळत चालला आहे. पण या पिढीच्या मुंग्याही मागच्या पिढीसारख्याच अज्ञानी आहेत. त्यांनी रेतीचंच वारूळ केलंय. माझा जोर पडून वारुळ भलत्याच ठिकाणी फुटलंय. आणि मुंग्या स्वातंत्र्य मिळाल्यागत वेगाने बाहेर पडतायत. त्या इतक्या आनंदी आहेत की आपण कालानुक्रमे आठवणीच्या कुठल्या कप्प्यात होतो याचाही त्यांना विसर पडलाय. कुणीही कुणाबरोबरही बाहेर पडतंय. त्यामुळे माझ्या बालपणीच्या आठवणीत अचानक मला कॉलेज दिसू लागलंय आणि कॉलेजात शाळेच्या गणवेषातली मधुरा. प्रौढ वयातली मी, माझ्या नोकरीच्या ठिकाणी मी लिहिलेल्या सिनेमाच्या स्क्रिप्ट्स देते आहे. आणि नोकरी सोडलेली मी, फॉर्मल वेषात कॉर्पोरेटचा आवेष आणून प्रोड्यूसर लोकांना भेटते आहे. मी पहिलीत असताना माझा आयपॉड चोरीला जातोय आणि पस्तीशीतली मी बिटुकली सायकल चालवत एका हाताने कुल्फी खातेय. मला वयाच्या तिस-याच वर्षी सासू सासरे आलेत आणि ते आतासारखेच वाटेल तसे गृहीत धरून वागतायत म्हणून माझा इवलासा जीव त्रासून गेलाय. कॉलेजमधे गेल्यावर घेतलेल्या स्कूटीवरून मी चौथीच्या स्कॉलरशीपची परिक्षा द्यायला चालले आहे आणि हॉलतिकीट बरोबर घेतलंय की नाही या विचाराने मला भयंकर दडपण आलंय. शाळेत बसवलेल्या नाटकाची प्रॅक्टीस मी प्रौढवयात माहेरी जाऊन भाऊ भावजयीसमोर करतेय आणि त्यांचे 'ही डोक्यावर पडलीय की काय' हे भाव पाहून मला या तंद्रीतही शरमल्यासारखे झालेय. या पाजी मुंग्या आतातर मोकळ्या जागेत पोहोचल्यात आणि हवे तशा एकमेकींत मिसळत चालल्या आहेत. त्यामुळे माझ्या मेंदूलाच काय, अंगाखाली आलेल्या हातालाही झिणझिण्या आल्या आहेत. हात बधिरला आहे आणि त्यानेच बहुधा एकाएकी माझ्या पापण्या झपकन उघडल्या आहेत. समोर भलीमोठी खिडकी आहे व बाहेर, तुंबाड सिनेमात पडतो तसा एकसूरी अखंड पाऊस पडतोय! मघाच्या आठवणींची सरमिसळ एकाएकी सॉर्ट होऊन त्यांचा कालानुक्रम व्यवस्थीत लागलाय. आता त्या सगळ्या बाहेरच्या पावसात झिम्माड फुगडी घालायला पसार झाल्यात. मी पुन्हा त्यांना वारूळात डांबणार नाहीये. या सर्वं आठवणी खरंतर आता माझ्या वयाच्या झाल्यात. तेव्हा जसे मी या वयात शहाण्यासारखे वागावे, अशी या संपूर्ण जगाची माझ्याकडून अपेक्षा आहे. तशीच त्यांच्याकडूनही माझी तेवढीच माफक अपेक्षा आहे!

-बागेश्री

Post a Comment

0 Comments