राधेचा पती "अनय" बद्दल जरासे. राधा कृष्णाचं नातं जगाला ठाऊक आहे. ते अनयला ठाऊक नसेल असं वाटत नाही. गोकुळभर गाई गुरांच्या खोऱ्याने अखंड उडणाऱ्या धुळीच्या कणांनी ही खबर घरोघरी, जागोजागी अलवार पोचवली होतीच. कुतूहलाने मी "राधा- अनय" असे शोधल्यावर कुठेही दोघांचे असे एकही चित्र मला सापडले नाही. कुठल्याही कलाकाराच्या मनाला या जोडीच्या कुतूहलाचा विळखा पडून त्यांचे चित्र काढावेसे वाटले नाही, त्यांच्या प्रापंचिक आयुष्याचा वेध घ्यावासा वाटले नाही याचे नवल वाटत राहिले.
पण अनय कसा असावा. त्याने राधेला कसे सांभाळून घेतले असावे. याचे कल्पनारंजन थांबले नाही. त्यातून स्फुरलेले हे स्फुट.....
----------------------------------------
हे अनय,
मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे आले
तू हा हात असा प्रेमाने हाती घेतलास..
अनेकदा,
मेंदीने रंगलेली माझी पावलं
यमुनेकाठी कान्हयाच्या
बासरीमागे
धावत गेली
आणि खुणेच्या
कंच आम्रमोहोराखाली
पोहोचूनही कान्हा
दिसला नाही तेव्हा
सैरभर होत घरी परतली..
अगदी त्याचवेळी
माझा घामेजला चेहरा
डोळ्यातलं हरवलेपण
टिपलंस तू स्पष्टपणे
आणि काहीही न बोलता
नेहमीसारखं बेमालूम
वावरत राहिलास..
मी माझी कामं उरकत असता
"का कान्ह्याने छळ केला माझा असा?"
या प्रश्नात
हजारदा बुडत, काठावर येत राहिले..
मला एकच काम दोनदा सांगावं लागे,
तेव्हा घरातल्यांचा रोष अंगावर घेऊन
माझी कामे निपटताना
सांग अनय
आणलंस कुठून इतकं शहाणपण?
कसं सहन केलंस
माझं नसलेलं असलेपण?
आणि वाहिलीस संसाराची धुरा एकट्याने नेटाने
हा असा हात हातात घेऊन,
काय न्याहाळत असतोस सांग ना मला?
हातावर ठळकपणे फक्त तुझी रेघ आहे
कुठलीच सावळी रेघ नाही
हे पाहून आनंदी होतोस की
माझ्या डोळ्यांतला
तुझ्याबद्दलचा परकेपणा
पाहून हतबल होतोस
काय पाहतोस सांग ना जरा,
हात निरखत राहतोस..!
सांग अनय,
का रडू दिलंस
आणि थोपटत राहिलास मला
कान्हा गोकुळ सोडून
जाताना?
कान्ह्याचा तुझ्यावर
विश्वास होता की
तो परतून येणारच नाही, ह्यावर तुझा??
कसा वाटून घेतला हा मोठेपणा
तुम्ही दोघांनी?
ह्या मोठेपणाच्या
भरवशावरच
संसार पार करतेय खरी
पण मनाची सारी गुजे यमुनामाईच्या
पोटात खोल दडवून टाकलीत मी कधीही
आणि आज तीच कशी
डोळ्यांमधून टपटपून
वाहू लागली आहे पहा
तू हात निरखत असताना...
सोड माझा हात,
काढ तुझी नजर
प्रत्येक श्वासाशी होणारा हा झगडा
आता सोसवत नाही रे...
-बागेश्री
1 Comments
राधेनंही सांभाळून घेतलं असावं. मन सैरभैर असताना शरीराचा आणि मनाचा तोल तिनंही सांभाळला असावाच. मौनातूनच झालं असावं तिचं आणि अनयचं हे संभाषण, ह्या वाटाघाटी! एकमेकांचं अपुरेपण पूर्ण करण्याचं सामर्थ्यही मौनानीच दिलं असावं.
ReplyDelete