दरी डोंगर कपा-यात तो एकटाच स्वःतशी हितगूज केल्यासारखा कोसळत असतो. झाडांची पानं न पानं चिंब होऊन ठिबकत राहतात. एका लयीत. कुठे साचलेया डबक्यात एक ताल. कुठे चिखलात त्याचं थिजणं. छोटी झुडूपं, नाजूक वेल, फुलांच्या पाकळ्या, वठलेली झाडं, आटलेली पात्र सारी सारी तृप्त समाधान पांघरून त्याचं संन्यस्त कोसळणं पाहत राहतात. किती युगं? हा सोहळा चालला आहे. त्या दूर निसर्गात जिथे कुठलं कौलारू घर नाही, ना पत्र्यांची छप्परं असतील त्याचं ताड तिरकिट ऐकू यायला. अशा जागी सबंध निसर्ग एक सुंदर लय साधून एक अविरत गीत गाण्यात मग्न होऊन गेला आहे असा भास होतो.
तुम्ही लाख प्रयत्न केला तरी हा सोहळा तुमच्या कॅमेरात येणार नाही. तुम्हाला निसर्ग होऊन पाऊस प्यावा लागेल. अशा जागा हेरून नुसतं जाऊन बसावं. मनावरची सगळी धूळ लख्ख धुवून घ्यावी. सुखाकरता नसती वणवण. धावून धावून दमलेली गात्र, निसर्गाच्या ह्या लयीत बुडवून टाकावीत. कोलाहलापासून दूर, चार क्षण पावसाचा नुसता आवाज ऐकण्याकरता जाऊन बसावं . निसर्ग लयलूट करतो, प्रेमाची, सुखाची पण इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्सला बांधलेले आपण, जगणे नावाच्या भरधाव घोड्यावर स्वार आपण, आपल्याला कुठे क्षणाची उसंत. आपण आपल्या आत बंद होऊन गेलोय. आपली काळजी, चिंता आपली, आपली दु:खं, ताण आपले, आपण आखलेले आपले टार्गेट्स असे अनेक दरवाजे गच्च लावून घेऊन आपण आपल्यातच बंद झालोय. कुठलीच खिडकी निसर्गात उघडत नाही. गार वारा, कोवळं ऊन, भुरभूर पाऊस काही म्हणजे काहीच आत येत नाही.
निसर्ग हाका मारतो. माणसं हाका मारतात. आपल्यापर्यंत ती हाक न पोहचू देण्याइतके आपण कुठे मग्न झालो. कधी मग्न झालो. जरासे थांबण्याने कुठली स्पर्धा आपल्याला हरवेल. निसर्गात उत्कटपणे रमून, भावनांना जरासा वाव देऊन आपण जगण्याच्या अजूनच जवळ जात असू तर? तर ते एकदा करून पहायला हवं.
कधीतरी आपणच मनावर घ्यावं, ज्या ज्या बंधनांनी बांधले गेलोय ते जरासे दूर सारावेत. लांब क्षितीजाकडे नजर टाकावी. उंच आभाळात पाहून दीर्घ श्वास घ्यावा. एखाद्याकडे पाहून मोकळंसं हसावं. एक एक दरवाजा आपोआप किलकिला होईल.... मग आपणच आपल्या बाहेर पडावं. जगतो आहोत, जिवंत असल्याचा अनुभव घ्यावा. फार काही नको... शांतचित्ताने दूर कुठे जाऊन पाऊस ऐकत रहावा. पावसाला पाऊस होऊन भेटावं....
मला सांगा, मेडिटेशन किंवा डिटॉक्स यापेक्षा काय वेगळा असणार आहे?
-बागेश्री
0 Comments