सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त


 
Remembering a great poet Shantabaai shelke


"सहजता" हा जितका सोपा वाटतो तेवढाच असाध्य गुणधर्म आहे. आणि शांताबाई शेळके यांच्या कविता असोत वा चित्रपटातील गीते जणू बसल्या बसल्या सहज सुचले आहेत असा भाव त्यात ओतप्रोत आढळतो. मग ती "चाल तुरुतुरु" असेल किंवा तो "डोलकर दर्याचा राजा" असेल, "ऋतू हिरवा" असेल वा, जरिमोलाच्या साडीला हात नका लावू, विनवणारी "रेशमाच्या रेघांनी" असेल. शब्द कसे सहज आल्यासारखे चपखल आपापल्या जागी बसणारे!! खरं सांगायचं तर, साधनेशिवाय सहजता येत नाही. शांताबाईंची शब्दसाधना काय असेल याची प्रचिती येते ती त्यांच्या अनेक गीत, कविता, ललित लेखांतून. साहित्याच्या सर्वच क्षेत्रात त्यांनी लीलया मुशाफिरी केली. तशीच ही एक कविता. "पैठणी". वरवर सोपी पण भावनेचा जरतारी पदर असलेली.
फडताळात एक गाठोडे आहे
त्याच्या तळाशी अगदी खाली
जिथे आहेत जुने कपडे
कुंच्या टोपडी शेले शाली
त्यातच आहे घडी करुन
जपून ठेवलेली एक पैठणी
नारळी पदर जरी चौकडी
रंग तिचा सुंदर धानी
नात कधी नव्हते ते जुने फडताळ चाचपते नी तळाशी तिला आजीची ठेवणीतली पैठणी सापडते. बाईच्या आयुष्यात असाधारण महत्व असणारी "पैठणी". माझ्या मते शांताबाईंनी प्रत्येक बाईच्या, ठेवणीतल्या सर्व भावनांचे रूपक म्हणून "पैठणी" वापरलीय असं मला वाटलं. प्रत्येक बाईच्या आयुष्यात येणारा अपरिहार्य टप्पा. लग्न करून परघरी जाणे. त्या घराला त्या क्षणापासून आपले सर्वस्व मानणे. या प्रवासाला साक्ष असलेली एक माहेरघरुन सासरी आलेली पैठणी! या रुपकामुळे कवितेतील गोष्ट केवळ नायिकेच्या आजीची नसून प्रत्येक बाईची होऊन जाते.
बाईचा एक विशेष गुण असतो ती आपली ठेवणीतली साडी अगदी खास सणासुदी कार्यसमारंभालाच नेसत असते. त्यामुळे तिच्या आयुष्यातल्या साऱ्या महत्वाच्या घडामोडींची साक्षीदार, पैठणी! सणवार म्हटले की घरभर धूप अगरबत्ती मोगरा शेवंतीचे सुवास. यातच काही मान- अपमानाचेही प्रसंग. घर नवे, माणसे नवी, संसार असा नवा - कोरा असताना जास्त टोचण्या लागलेले प्रसंग तिने निमूट गिळलेले. किंबहुना हसतमुखाने गिळलेले.
शांताबाई म्हणतात,

धूर कापूर उदबत्यांतून
जळत गेले किती श्रावण
पैठणीने जपले
एक तन.. एक मन..
माखली बोटे
पैठणीला केव्हा पुसली
शेवंतीची चमेलीची
आरास पदराआडून हसली

सारे जून होत असताना पैठणी देखील जुनी होत गेलेली.
आपला कडकपणा सोडून मऊपणा ल्यालेली. बाईला संसाराचा सराव झाल्याची, ती या घरात येऊन इथे रुळत गेल्याचं ते रूपक आहे. या कवितेत एक उल्लेख आवर्जून येतो. ते म्हणजे आजीला अहेवपणी (म्हणजे नवरा जिवंत असताना) स्वर्गवास झाल्याचा.
ही कविता जुन्या काळाशी सुसंगत अशी धरली, तरी आजही मला कुठेतरी बाईला नवरा सोबत असताना लाभत असलेली त्यामागची सुरक्षिततेची भावना अधोरेखित करणारीच वाटते. अर्थात आजची स्त्री सक्षम आहे, कर्तबगार आहे. परंतु मन जुळलेला, आपल्याला समजून घेणारा, सुखदुःखतला साथीदार आपण मरेपर्यंत सोबत असावा हे वाटणे गैर नाही.

वर्षामागुन वर्षे गेली
संसाराचा सराव झाला
नवा कोरा कडक पोत
एक मऊपणा ल्याला
पैठणीच्या घडीघडीतून
अवघे आयुष्य उलगडत गेले
अहेवपणी मरण आले
आजीचे माझ्या सोने झाले

तर आजीच्या पैठणीला छातीशी घट्ट धरून बसलेली नात. कदाचित, आज संसाराचे हेच वर्तुळ पूर्ण करते आहे! म्हणून ती म्हणतेय की,
कधीतरी ही पैठणी
मी धरते ऊरी कवळुन
मऊ रेशमी स्पर्शामध्ये
आजी भेटते मला जवळुन

जणू आपल्या आजीच्या बाईपणाचा प्रवास स्वतःच्या अनुभवातून उलगडणारी नात हळवी होत पैठणीशी कुजबुजते की....
मधली वर्षे गळुन पडतात
कालपटाचा जुळतो धागा
पैठणीच्या चौकड्यानो
आजीला माझ्या कुशल सांगा!

अशी शांताबाईंची साधीसोपी परंतु नातीमार्फत आजीच्या आयुष्याचा हळवा प्रवास सांगणारी पैठणी, जितकी जुनी होत जातेय तितका तिच्या घड्यांमधून दडलेला अत्तराचा सूक्ष्म गंध दरवळत जातोय...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments