मेवाड पाहिलं. जराशी पायपीट केली. थोडे गाडीतून फिरलो. जे प्रकर्षाने सर्वत्र जाणवलं ते हेच की राजस्थानाला स्वाभिमानाची लकेर आहे. मेवाडचा इतिहास सुरू होतो थेट 8 व्या शतकापासून. मेवाडच्या राजांची मूल्यं कायम परकीयांना शरण न जाण्याची, तिथे मान न तुकवण्याची राहिली. एकलिंगजी (भगवान शिव) यांची ही सत्ता असून आपण केवळ दिवाण आहोत, राज्य राखणे हे आपले काम, राजभोग नव्हे. हे मूल्य उरिपोटी घेऊन बाप्पा रावल ह्यांनी मेवाड संस्थान उभे केले होते जे त्यांनी प्राणपणाने राखले. चित्तोढगढ आजही त्याची साक्ष देत उभा आहे.
पुढे, अल्लाउद्दीन खिलजीचे चित्तोढगढावर आक्रमण झाले. राणी पद्मिनीकरता त्याने जीव काढून ठेवला व त्या स्वाभिमानी स्त्रीने स्वत्त्वासाठी १६,००० बायकांना घेऊन जौहर केला. (यात खिलजी केवळ राजसत्तेच्या लालसेने आला होता व गढ पडल्याचे लक्षात येता पद्मिमीनीने जौहर केला असाही एक मतप्रवाह आहे. परंतु पद्मिनीकरताच आक्रमण झाले होते अशीच स्थानिय लोकांची मान्यता आहे व तीच गोष्ट ते रंजकतेने आपल्याला सांगतात)
इतिहास इथे थांबत नाही. चित्तोडगढावर वारंवार आक्रमणे होत राहिली आणि राजे हरत असताना बायकांनी गनिमाच्या हाती लागण्यापेक्षा दरवेळी जौहर पसंत केला (एकूण 3 वेळेस!). एव्हाना चित्तोडच्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज राजांना येऊ लागला होता, अशी अगणित परकीय आक्रमणे होत राहणार, हार नशिबी येणार आणि आपल्या बायका जौहर करत राहणार. हा काळ शौर्यप्रतापी राणा सांगा यांचा होता. राणा सांगा मेवाडाच्या इतिहासातलं असं प्रखरप्रतापी नाव आहे ज्यांनी ख-या अर्थाने राज्यविस्तार केला, बाबरला पाणी पाजले. त्यांच्या शौर्य व स्वाभिमानाबद्दल लिहायचे झाल्यास एक वेगळी सविस्तर पोस्ट लिहावी लागेल. पण इथे इतकंच सांगेन की त्यांना ४ मुले होती आणि ती क्रमाने गादीवर येत होती. जेव्हा तिसरा राजपुत्र राजा झाला तेव्हा एका दासीपुत्राने घातपाताने त्याला ठार केला. गादी हडपली. एवढ्यावर तो थांबला नाही. तर उर्वरित राजपुत्र, उदयसिंगाकडे वळला. तोच गादीचा शेवटचा हक्कदार होता. खबर उदयसिंगाची आया पन्नादाईला लागली. दासीपुत्र बनबीर नंगी तलवार घेऊन उदयसिंगाला शोधत येतोय. तिने झटपट निर्णय घेतले, टोपलीत उदयसिंगाला भरून वर झाडपत्ते झाकून त्याला एका नोकराकरवी चित्तोढगढच्या बाहेर पळवला व स्वत:च्या: पोटचं पोर चंदन याला राजपुत्राची वस्त्रे घालून बिछान्यात निजवले. क्रूर बनबीरने उदयसिंग समजून चंदन बाळाचे शीर धडावेगळे केले. रक्तलांछित तलवार घेऊन एक दासीपुत्र मेवाड सम्राज्याचा राजा झाला.
इकडे उदयसिंग एका किल्लेदाराचा भाचा म्हणून मोठा होत होता. तो जाणता झाल्यावर रयतेने त्याचा राज्यभिषेक केला. आणि राणा उदयसिंग मेवाडचे राजे झाले. त्यांनी पुन्हा राज्यावर ताबा मिळवला व चित्तोढगढावरून राजधानी एकदाची हलवली. रयत एक झाली. नवा महल बांधला. अख्खे नवे शहर वसवले. तेच आताचे उदयपूर. अशाप्रकारे मेवाडच्या राण्यांचे जौहर थांबले! याच उदयसिंगांच्या पोटी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला. ज्यांनी अकबराला धूळ चारली. हल्दीघाटी मधले युद्ध भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची नोंद आहे. (याबद्दल भाग २ मध्ये सविस्तर लिहितेय)
आज राणा प्रतापांचे नाव राजस्थान ज्या अभिमानाने घेते तेवढ्याच आदराने पन्नादाईचेही नाव घेतले जाते. आपले ममत्त्व बाजूला ठेवून त्या क्षणाला ती आपल्या कर्तव्याला जागली. मेवाडच्या इतिहासाला अशा अनेक त्यागांचे तोरण आहे. या घटनांची साक्ष देत उदयपूरचा राजमहल म्हणजे सिटी पॅलेस उभा आहे. (खाली पॅलेसच्या बाहेरून व आतले काही फोटो देतेय) हा महल उदयसिंगांनी बांधला, म्हणजे सुरुवात त्यांनी केली सन १५५३ मधे. त्यानंतर ४०० वर्षांच्या कालावधीत विविध राजांनी सातत्याने बांधकाम करवले. त्या त्या वेळच्या आधुनिक डिझाईन्सचा समावेश केला. आज दिसणारं पॅलेस या सा-याचा परिपाक आहे.
-बागेश्री
to be continued to battle of HaldiGhati
Pic 1: शिशमहल: King's Bedroom
Pic 2 : महालाच्या आतला झोका
Pic 5: राणीचा महाल. इथे ती बसून त्या तयार व्हायच्या (Makeup room) वर लाल रंगाचा कापडी पंखा आहे. त्याची दोरी दिसतेय. समोर घातलेली बेडशीट शेकडो वर्षांपूर्वीची मागावर विणलेली व छापे मारून प्रिंट केलेली आहे
0 Comments