रंग....!

अनेक रंग माझ्या ओंजळीत दिलेस, हळूवारपणे...
हरखून गेले ते रंग पाहताना. माझ्या ओल्या डोळ्यात त्या इंद्रधनूचं प्रतिबिंब तरळलं. नजर हलेना माझ्याच भरलेल्या ओंजळीवरून...
तू  :    पाहतेस काय?
मी :    हे...... हे रंग.. कित्ती आहेत!! सुंदर एक- एक...
तू  :    तुझेच आहेत
मी :    सगळे?
तू  :    हो
मी :    काय म्हणू?
तू  :    डोळ्यांनी सांगितलं सारं.. हे रंग वापर, वापर बिनघोर तुला हवे तसे
मी :    मनसोक्त?
तू  :    हो, मन सो क्त

मी :   हा हिरवा, हा लाल, हा केशरी, हा पारवा, करडा- गव्हाळ! हा का देतो आहेस?
तू  :   तुझी कांती, गव्हाळ म्हणून
मी :   पण ह्या रंगामूळेच तुला बरंच काही ऐकावं लागेल
तू  :   तुला, कटू भाव येणार असतील, तर आण तो इकडे
मी :   काय करशील त्याचं?
तू  :   ठेवेन जपून, तुझ्या इतकाच
मी :   वेड लावलंस आज मला
तू  :    ....
मी :    आयुष्याचा कॅनव्हास पुन्हा रंगवायला घेईन
तू  :    शुभ्र कागदावर?
मी :    हो, मला मदत करशील?
तू  :    बोल ना, काय ते
मी :    खूप दिवसांनी इतके रंग एकत्र पाहते आहे रे, कुठला- कुठे- कसा उतरवू, सांगशील?  
तू  :    सुरुवात कर हिरव्याने..!!
मी :    सुखाचा रंग तो, तू सर्वाथाने देऊ केलेल्या
तू  :    त्याच्या भोवती गुलाबी पेर
मी :    आपल्या इवल्या विश्वातल्या प्रेमाचा?
तू  :    मग घे, केशरी उधळ मुक्तपणे
मी :    माझ्यातली बंडखोरी हेरतोस?
तू  :    आता ओत अवकाशाचा आकाशी अथांगपणा
मी :    तुझ्या मनाचा ठाव घेणारा?
तू  :     मग पारवा
मी :     माझ्यातला अवखळपणा?
तू  :    मग बुंद लाल
मी :    तुझ्यातल्या जगण्याच्या जिद्दीसारखा, गडद पण मोहक, असा?
तू  :    आता पिवळट हलक्या- फिकट छटा
मी :    म्हातारपणाची सोबत म्हणून?
तू  :    .....

मी :    अरे, पण चित्र पूर्ण करायला, काळा नको?
तू  :    .... मी असेपर्यंत, 'दु:ख' असे थेट ओंजळीत येणार नाही तुझ्या! 

-बागेश्री
 

Post a Comment

5 Comments

  1. अतिशय तरल.. मनापासून लिहिलेलं... थेट मनापर्यंत जाणारं..
    अभिनंदन!

    ReplyDelete
  2. shevat nehami sarkhAch... class a part :)

    ReplyDelete
  3. सर्व लेखन आवडले.
    काळ्या रंगाचे दु:खाशी जोडलेले नाते ही आवडले.

    ReplyDelete
  4. khuuuuuuuuup goad... :)

    ReplyDelete