Thursday, 29 December 2011

(वि)स्मृतीगंध!

एकापेक्षा एक उंच, आकाशाशी स्पर्धा करणार्‍या इमारती आणि वर आकाशी कमनीय चंद्रकोर..
खाली झगमगत्या काँक्रिट जंगलाचा मानवी आविष्कार तर वरती निसर्गाचा कोवळा आविष्कार...!
ठाण्याच्या प्रशस्त फ्लायओव्हर वरून भरधाव जाणार्‍या बसमधून हे नजरेत भरत होतं...

बसच्या त्या गतीच्या दुपटीने, मन गतकाळात खेचलं गेलं..

कुठे होतो आपण? 
लहानगं गाव, गाव नाही - अनेक गावं! 
तुकड्या तुकड्यांनी प्रत्येक गावी होत गेलेलं शिक्षण, जमवलेले मित्र मैत्रिणी मागे टाकत पुढचा घडत राहणारा प्रवास.. 
ओघानेच पूर्ण केलेले डिग्रीचे शिक्षण आणि शेवटी नोकरी.. अशाप्रकारे नोकरीसाठी गाठलेली ही मुंबई!!

लहानपणी वृत्तपत्रात, मासिकांत पाहिलेली ही मुंबापुरीची चित्रे- झगमगाटाची, धावत्या लोकलची, माणसांची, प्रशस्तपणाची, माणुसकीची! आज रोजच्या जीवनातला कितीतरी सहजतेने भाग होऊन गेलेली.

रोज घड्याळीच्या काट्यापेक्षा सेकंदभर पुढे पळताना, गतकाळ मात्र मुठीतून निसटलेला... चौपाटीवरच्या वाळूसारखा!

ती शाळा, ते डबे, लोणच्याची फोड, प्रार्थना, फुटलेले गुडघे, न केलेला गृहपाठ, खोटेच दुखलेले पोट, मास्तरांच्या केलेल्या नकला, खेळात लिंबू -टिंबू ठरविल्याचा राग, आजारी पडल्यावर आईचं मिळणारं खास अटेंशन, बाबांनी ऑफिसमधून येताना आणलेला खाऊ.. 
मोठे होत असताना आईची असणारी कडवी नजर, आता जगणेच आपला बनलेला गुरू, मित्रांची साथ, पहिले प्रेम, सफलता- असफलता, कॉलेज लाईफचं नाकात शिरलेलं वारं आणि तरुणाईची धुंदी...

आता पडलेल्या जबाबदार्‍यांत, ह्या आठवणीही पुसटलेल्या...

आज जरा बसावं म्हणते.. हातातलं घड्याळ बाजूला काढून ठेवून..

विस्मृतीचं जुनाट कपाट उभं करून ठेवलंय मनाच्या कोपर्‍यात, हव्या- नको त्या गोष्टी "सध्या लागत नाहीत" असं म्हणत, त्यांची गाठोडी करून, कोंबण्यापुरतीच त्या कपाटाची दखल घेत आले आहे... आज जरा वेळ काढावाच, घ्यावं हे कपाट नेटकं मांडायला...!

काढावीत एक एक गाठोडी, कराव्यात आठवणी मोकळ्या थोड्या..
काही अत्तर मारून ठेवलेले क्षण पुन्हा सुखावतील..
काही ठेवून जीर्ण झालेल्या आठवणींची गाठोडीच बदलावीत- एक अत्तराचा फाया त्यातही ठेवेन म्हणते.. पुढच्या वेळी पुन्हा उघडेन हे कपाट तर गंधाळाव्यात त्याही!!

-बागेश्री

Featured post

आजीमाय

लग्न कार्याशिवाय माझं माझ्या आजोळी, नांदेडला जाणे होत नाही. एकदा असेच लग्नकार्यानिमित्त तिथे होते,  साधारण दीड- दोन वर्षांपूर्वी. मामे- भाव...