(अ)पाहुणचार

आमच्या ओळखीतले एक आहेत. माझं मुद्दाम कधी त्यांच्याकडे जाणं होत नाही. कधी एखाद्या कार्यक्रमाचे आमंत्रण वगैरे द्यायला जावे लागले तरच चक्कर होते. मी गेल्यावर ते जोडपे "अग्गं सारु, ये ये येss, कित्ती दिवसांनी आलीस" म्हणत माझ्यासोबतच सोफ्यावर ठिय्या मारत, इकडच्या तिकडच्या गप्पा हाणत, हिचं तिचं त्याचं सध्या काय चाललंय चं चौकशीसत्र सुरू करतात. आपण इतके प्रश्न विचारलेत की उत्तरे देऊन बिचारीचं तोंड कोरडं पडलं असेल अशी भावना होऊन तरी ते मला (किमान) पाणी विचारतील तर फार बरं, असं मला होऊन जातं. शेवटी त्यांच्या गप्पा काही आवरत नाहीत पाहून मी माझ्या पर्समधील पाण्याची बाटली काढून अधाशासारखी पिऊ लागल्यावर "अगं तहान लागली तर सांगायचं नाही का? भिडस्त कुठची!!!" असं म्हणून काकू घाईने आत जातात कारण बाटलीतलं पाणी पाहून त्यांना "चहाचं आधण आटलं की बाई गप्पांमध्ये" हे आठवलेलं असतं. यावर काका जनाची नाही मनाची उक्तीला अनुसरून "सारूसाठी पण टाक गं जरासा" म्हणताच आतून "आपण आज ओळखतोय का तिला? चहा कुठे पिते तीssss" म्हणून मुद्यावर सपशेल पडदा पाडतात.       
आपल्यामुळे यांचा चहा लांबतोय हे ध्यानात घेऊन मी काढता पाय घेतच असते एवढ्यात काकू थेट माझ्या तोंडासमोर येऊन जवळ जवळ दटावल्यागत (तर्जनी डावी उजवीकडे वारंवार नेत) " पुढच्यावेळी जेवल्याशिवाय जाऊ द्यायची नाही मी, काय सारे?" असा अनेकवर्षांपासून घासलेला (सत्यात कधीही न उतरलेला) डायलॉग मला ऐकवतात आणि मी तिथून निसटते.
      तर झालं असं की, यांच्या मुलाकारता माझ्या ओळखीतले एक स्थळ घेऊन जायचा प्रसंग पडला. म्हणजे मी मध्यस्थी वगैरे नव्हते. दोन्ही घरे एकमेकांना दुssssरून ओळखत होती. व मी दोन्ही घरांची (म्युचवल) नातलग होते. फक्त तेवढ्याकरता मुलीच्या घरचे माझ्या फ्लॅटवर उतरणार होते व त्यांना मला "अपाहुणचार" जोडप्यांच्या घरी पोचवण्याचा जिम्मा पार पाडायचा होता. या कार्यक्रमाकरता माझी एक सी. एल. खर्ची पडली होती. मुलीने तयार होणे, त्यात साडी नेसणे, गजरे माळणे, वीस वेळेस आरशात पाहणे, वडिलांनी तिच्याकडून प्रश्नोत्तरांची तयारी करून घेणे वगैरे एपिसोड माझ्या फ्लॅटवर पार पडत होते (मी लग्न या भानगडीतच न पडल्याने, चहा पोहे कार्यक्रम माझ्यासाठी मजेशीर होता) बघण्याच्या कार्यक्रमामुळे म्हणा, वा इतर काही, मुलीच्या घशाखाली अन्नाचा एक कण उतरला नाही. की तिच्या आईबाबांनीही विशेष खाल्ले नाही. मुलीचा भाऊ मात्र "सारुतै लै भारी झाली इडली, वाढ की अजून चार-पाच" असे प्रत्येक वाढीला म्हणाला. त्यानेतरी पोटभर खाल्ले याचा मला आनंद झाला.
      अपाहुणचार वाल्यांनी दिलेल्या वेळेत मी मुलीकडच्यांना पोचते केले. साडीची सवय नसलेल्या बिचा-या वधू उमेदवाराची तारांबळ पहात आम्ही एकदाचे दाखल झालो. आणि एकाएकी मला फारच महत्व आल्यासारखे झाले. कारण "येयेये सारू" न म्हणता "या या या सारिका ताई" असं नेटकं स्वागत झालं. त्यांच्या हॉल मध्ये ट्युबलाईट आहेत हे आज पाहिल्यादाच मला कळलं. खाली चक्क गालिचा व टीपॉयवर पाण्याचे "भरलेले" ग्लास पाहून दाटून वगैरेही आलं. हे दोन परिवार कसे ओळखीचे निघाले आणि जग किती लहान आहे वगैरे बोलणी झाली. मुलीच्या प्रश्नोत्तराचा राऊंड झाला. त्यानंतर काकांनी जनाची नाही मनाची उक्तीला अनुसरून "अगं प्लेट्स आण आता" म्हणताच काकू आत पळाल्या. व काही सेकंदात किचनमधून खुणावून मला बोलावू लागल्या. मी आत गेल्यावर गहन समस्येचा उलगडा मला झाला की त्यांनी त्यांच्या 3, वधूच्या घरच्या 3 व माझी 1 एवढ्याच प्लेट तयार केलेल्या. वधूचा भाऊ वाढीव भरला. (त्याने इडल्या भरल्यात, हे मी सांगितले नाही) "काकू, मला नकोय काहीच, मी घरून इडली खाऊन आले" हे वाक्य पूर्ण होताच त्यांनी सुस्कारा टाकत मला पुन्हा बाहेर पिटाळले. प्लेट्स आल्या. प्रत्येक प्लेटमध्ये 3 टेबल स्पून चिवडा व अर्धी बर्फी वाढलेली. प्लेट्स घेऊन मुलगा मुलगी तडक आत गप्पा मारायला गेले. (तेव्हा घरात सगळीकडे ट्युबलाईट आहेत, हे ही मला पाहिल्यांदाच समजलं) सगळ्यांची प्लेट झपकन रिकामी होताच, एका लहानशा वाटीत चिवडा घेऊन काकूने सर्वांना "घ्या हो लाजताय काय, आता होणारे नातेवाईक आपण" म्हणत आग्रह केला. पुढे चहा आला. प्रत्येक कपात 4 टेबलस्पून असावा.
        गंमत अशी की, 3 BHK फ्लॅट, मुलाची आय. टी. कंपनीतली नोकरी, एकुलता एक मुलगा व नोकरी करण्याची इच्छा असणारी मुलगी इतक्या गुणांकावर ते स्थळ जमलं. आनंदी आनंद साजरा झाला. गळाभेटी झाल्या.
ते खाली आम्हांला सोडायला आले. मुळा मुलीत नैत्रपल्लवी वगैरे झाली. निरोप झाले. मी कारमध्ये बसण्याआधी बंदुकीतून गोळी सुटावी त्या वेगाने काकू माझ्या जवळ आल्या, माझे दोन्ही खांदे घट्ट पकडले अन् " पुढच्यावेळी जेवल्याशिवाय जाऊ द्यायची नाही मीsss, काय सारे?" म्हणाल्या.
-बागेश्री
   

Post a Comment

0 Comments