दवबिंदू....!

मी व्यर्थसा दवबिंदू
पानावर गोठलेला,
धरणीला जो नकोसा
आकाशाने त्यागलेला..!

तुज रुपवान भासे,
मज भासे, मी अभागी
उदास घुसमटतो,
थिजतो, बसल्या जागी...!

क्षणभंगूर सारे काही
जाणतो आपण सारे,
देखणे दिसणे फक्त
हे जगणे आहे का रे..?

पानावर ओल्या ओल्या
मी खिन्नसा बसलेला
टिपेल का मज कोणी,
आशेवर बेतलेला..

मज नाते ना रुचते
ना जमते बिलगाया,
थिजणे संपून जावे
वाटे जन्म नवा घ्यावा!
जिथे स्वैर मी असावे
अलगद मी रुजावे,
अन् माझ्या रुजण्याने
जन्म नवे उमलावे..

ही इच्छा अधू आहे
ही आसही कोरी कोरी,
मज ठाव आहे सारे
जन्म, ना कोणी उद्धारी!

घे जगून संपतो आहे
मी मिथ्या जगलो आहे,
इच्छा लपेटून सार्‍या
जागीच विरतो आहे!

माझ्या रूपाने जिंकले
तुज पुरते मोहवले,
पण जाण जगा, तू ही
मी जगलो थिजलेले!!

मी जगलो थिजलेले...

Post a Comment

0 Comments