Friday, 7 June 2013

चल खरेदी करूया, पावसाच्या दोन सरी...

गर्दी ओसंडली आहे
आकाशीच्या ह्या बाजारी,
चल खरेदी करूया
पावसाच्या दोन सरी...

सर येईना एकली
म्हणे मेघ हवा काळा,
घेऊ विकत त्यालाही
दारी बांधू पावसाळा..!

वाट पहाणेच नको
हवा तेव्हा कोसळावा,
बारमाही अंगणात
कोंब हिरवा हिरवा..

नाही कुठे रखरख,
पाण्यासाठी वखवख..
मेघ माझा, सर माझी,
श्रीमंत मी झाले बघ!

ऐक ऐक हे वरूणा,
माझी पिशवी अभ्रांची
दे तू मेघ आणि सरी
घाई घरी रे जाण्याची...

"अगं बाळे, जागी हो तू
पावसाला कोण बांधे?
आहे माझ्या मालकीचा
माझ्या घरातच नांदे!"

परते मी नाराजीने
मागे मागे मेघ आला,
पावसाला पाठवतो,
अलवार आश्वासला...

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...