मृत्यूपत्र

तो:  मृत्यूपत्र लिहीते आहेस
ती:  हो
तो:  माझा वाटा लिहीलास?
ती:  कोण तू
तो:  विसरलीस?
ती:  नाही. विसरले नाही. मृत्यूपत्रात तुझ्यासाठी
      लिहीण्याजोगं काही उरलं नाहीय माझ्याकडे
तो:  खरंच?

(तिनं पेन बंद केलं, खुर्चीत मागे ज़रा रेलून बसली, थेट त्याला डोळा भिडवत म्हणाली)

ती:  हो!
तो:  एके काळी खूप प्रेम होतं तुझं माझ्यावर
      जगणं माझ्या नावे करून टाकण्याची भाषा होती
      आता वेळ आली तर हे असं?

(कानामागे केसांची बट सारत ती म्हणाली)

ती:  होय. असंच.
      अवस्था होती रे ती फ़क्त, जगता जगता आलेली,   
      जगता जगता संपलेली.... एक अवस्था

तो:  माहिती आहे मला, परिस्थीती नावाचा विचित्र        
      प्रकार असतो, त्याला जिंकायचीच सवय असते

ती:  मीही खूप काही शिकलेय आता. सोड ते.
      तू आज इथे कसा, ते सांग.
तो:  समजलं मला, तुझी आवरा- आवर सुरू झाली
      आहे, म्हटलं यावं पाहून मला कुठे जागा देतेस ते!

ती:  तुला खरंच जागा नाही कुठे. आठवणीही
      पूसट झाल्या आहेत.
तो:  मला त्या गडद करू देशील?
ती:  कुठल्या हक्काने विचारू शकतोस
तो:  तुझ्या क्षणांवर मी राज्य केलंय कधीकाळी,
      त्याच्या जोरावर

ती:  मी वेडी होते
तो:  पण मनमुराद जगली होतीस, माझं गारुड
      जगण्यावर घेऊन.
      आज आलोय मी तुला हवी असलेली साथ द्यायला

ती:  कुठली साथ?
      जगताना रिकाम्या राहिलेल्या जागा भरायच्या?
      मागे जाऊन? वेडेपणा आहे सारा

तो:  असं पाहू नकोस!

(तिने नेटाने पेन उघडलं, लिहायला घेतलं, तो तसाच, तिथेच)

ती:  काय हवं तरी काय तुला?
तो:  तुझ्या मृत्यूपत्रात माझ्या नावे काही लिहीशील?

ती:  मी सगळं सोडलंय इथेच... तुला वेगळं काय हवं.
      बरं माग, तरीही माग, घे मागून. देईन मी!

तो:  मी निघून गेल्यानंतर ज्या आठवणींवर जगलीस,
      त्या आठवणी देशील?

     ज्या क्षणी मनाने मला त्यागलंस तो क्षण देशील?

(तिच्या हातातलं पेन तसंच उघडं राहिलं, हाताखालचा अर्धा लिहीलेला कागद कितीतरी वेळ फडफडत राहिला........)

-बागेश्री

Post a Comment

1 Comments

  1. Hello..
    Earn money from your blog/site/facebook group
    I have visited your site ,you are doing well..design and arrangements are really fantastic..
    Here I am to inform you that you can add up your income.
    Our organization Kachhua is working to help students in their study as well as in prepration of competitive examination like UPSC,GPSC,IBPS,CA-CPT,CMAT,JEE,GUJCATE etc and you can join with us in this work. For that visit the page
    http://kachhua.in/section/webpartner/
    Thank you.
    Regards,

    For further information please contact me.

    Sneha Patel
    Webpartner Department
    Kachhua.com
    Watsar Infotech Pvt Ltd

    cont no:02766220134
    (M): 9687456022(office time;9 AM to 6 PM)

    Emai : help@kachhua.com

    Site: www.kachhua.com | www.kachhua.org | www.kachhua.in

    ReplyDelete