Monday, 15 December 2014

दिवास्वप्न


ओले केस वाळवण्यासाठी ती कधीपासून तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उभी होती...
कधीतरी नजर शून्यात लागली
दूर दूर वाळवंट दिसू लागलं
बघता बघता डोळे भरून आले
डबडबल्या डोळ्यांत
मृगजळ आलं
मृगजळातून तो धावत तिच्याजवळ आला
खिशातून रुमाल काढला
झटकला,
त्याची सतरंजी झाली..
त्याने ती खालच्या हिरवळीवर पसरली
तिला बसण्यासाठी हात पुढे केला
तिने उत्स्फूर्त टाळी दिली
मनमोकळी हसली..
तिच्या प्रसन्न हास्यात त्याला नुकती उमललेली जुई दिसली
एक एक फूल त्याने खुडलं
त्याचा गजरा केला
तिच्या लांबसडक केसात माळला..

तिच्या ओलसर केसांना जुईचा मंद गंध कसा,
हे मात्र काही केल्या तिला उमजेना....!

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...