Friday, 12 December 2014

पिंपळ

टांगून ठेवली आहे एक रात्र
गावाबाहेरच्या पिंपळाला..

तो पिंपळ कधीच ढकलला गेलाय,
गावकुसाबाहेर!
आता ती रात्रही...
त्या रात्रीला लगडलेला तिचा चांदवा, काही तारका तशाच आहेत..

त्या रात्रीनं प्रामाणिक होत
उलगडले होते काही सत्य
झाली होती मोकळी
घुसमट गावाच्या पदरात घालून!
षंढ गावानं दिली शिक्षा हद्दपार होण्याची....

आजही कुणी दमला प्रवासी
पिंपळपारावर बसतो,
पाहतो शुभ्र कोर
आणि गळणारी उल्का...
त्याला वाटतं हे स्वप्न पूर्ण करणारं झाड आहे!

-बागेश्री

No comments:

Post a Comment