श्यामा

आरशातल्या डोळ्यांत खोल पाहूनही
माझा मला पत्ताच लागत नाही तेव्हा जी धावत तुझ्याकडे निघते
ते श्वास उसवतो
काटा रुततो
धाप लागते
गात्रे फूलतात
तुझ्या समोर येऊन उभी राहिल्यावर
श्यामा निखळ हसतोस केवळ
किती जाणतोस,
जाणतोस की काय प्रश्न पडला असावा
आणि कुठल्या उत्तराला शोधत तुझ्यापर्यंत पोहोचले असावे...
ढळता पदर एकसारखा खांद्यावर करून देताना,
तू माझा कोण वाटतोस म्हणून सांगू...
स्वतःचा शोध लावायला निघून
तुझ्यासमोर आल्यावर,
"तू माझा कोण"
ह्या प्रश्नांत गुंतताना
सा-या चराचरावर तुझं अखंड अधिपत्य आहे, ह्याचा विसरच मला पडतो कसा?
तुझ्या खळीतली गर्भ पोकळी
माझ्या स्वाधीन करुन,
भेटीची खूण म्हणून वैजयंतीची चार फुलं  ओंजळीत देऊन माझी परतणी करतोस,
तेव्हा मला माहितीही नसतं की,
आणखी नवे प्रश्न आणि न मिटलेल्या शंका घेऊन मी परतते आहे
तुझ्या विरहाने तुझी मोहिनी उतरते तेव्हा,
मी सैरभैर आरशाशी जाते कान्हा,
आणि तिथे स्वत:लाच सापडत नाही
प्रयत्न करुनही सापडत नाही..!
केवळ पोकळी असते आसपास आणि फुलांची ओंजळ नजरेत येते..
तेव्हा माझं आस्तित्व त्या वैजयंतीच्याच रूपाने तुझ्या कंठात अविरत झुलतं आहे, हे जाणवून मी शांत होत जाते श्यामा, शांत होत जाते...
-बागेश्री

Post a Comment

0 Comments