Wednesday, 9 September 2015

जिना

मुसळधार पाऊस लागून होता.
ऑफिस चुकवून चालणार नव्हतं.
रेनकोट, छत्री सारा सरंजाम चढवून जिना उतरून खाली आले तेव्हा जिन्याखाली खुडबूड जाणवली...

एक भेदरला जीव, आडोश्याला आला होता.
दहा- बारा वर्षाचं पोर.
खूप धावत येऊन तो तिथे स्थिरावला असावा. काळजाची लपलप, श्वासाचा वेग.
निथळत्या अंगाने, भेदक नजरेने तो बघत राहिला. एकटक!
मी विश्वासाचा हात पुढे केला तसं त्यानं अंग चोरलं.
अजूनच जिन्याखाली सरकला.
एक धपापतं कुत्र्याचं पिल्लू, तितक्याच तत्परतेनं त्याच्या आडोश्याला शिरत गेलं, आश्वासून.
त्याने पिल्लाला बिलगतं घेतलं.

पिल्लासाठी त्याचा जिना होताना मी बघत राहिले

-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...