पाठलाग: डोळ्यांच्या कॅमेरातून
तो रस्त्याच्या शेवटी, डावीकडे वळला.
एका गल्लीत शिरला.
तीही त्याच्या मागोमाग गल्लीत शिरली आणि तो दिसेनासा झाला.
अरुंद, निमूळती, सरळ गल्ली. ह्या टोकाशी उभं राहिलं तर ते टोक दिसावं. रस्त्याच्या दो बाजूंना एकाला एक लागून घरांच्या रांगा.
बर्यापैकी सकाळची वेळ. नळाशी गलका. रस्त्यावर सडा रांगोळीची घाई.
ती चालत राहिली. कुठल्याशा घरात तो शिरला असावा, असं समजून अंदाज घेत राहिली.
अनेक चेहर्यावर अनेक प्रश्नचिन्ह उमटले.
नळाशी जमलेल्या कलकलाटाच्या रुंद कपाळांवर आठ्या पडल्या. कपाळीच्या टिकल्या आठ्यांच्या जाळीवर तरंगल्या.
ती चालत राहिली.
गल्लीच्या दुसर्या टोकाला, डावी उजवीकडे दोन वाटा फुटत होत्या. तशी ती थांबली. वरुन कुठूनतरी काहीतरी खुडबूडलं. तिने मान वर केली, हनुवटी रस्त्याला समांतर येईल, इतकी मान ताणली.
एका घराची लाकडी बाल्कनी अर्ध्या रस्त्यापर्यंत आलेली, कानोसा घेतला. काही जाणवलं नाही, तेव्हा आली तशी परत निघाली.
गल्लीच्या बाहेर पडत उजवीकडे वळली.
हमरस्त्याला लागली.
स्वतःच्या घराशी येताच पुन्हा मागे वळून पाहिलं.
आज तिने मनाचा हिय्या करून, पाठलाग करणार्याला तोंड द्यायचं ठरवताच, तो असा मागच्या मागे पळून गेला होता.
आत्मविश्वासाने पायर्या चढण्यासाठी तिनं उजव्या हाताने कठडा धरत डावा पाय पहिल्या पायरीवर टाकला.
ओठभर हसली.
-बागेश्री
0 Comments