Friday, 2 October 2015

भेट


ती बैठकीत होती. बाहेरच्या ओसरीवर त्याच्या पावलांचा आभास होताच ती आतल्या खोलीकडे धावली.
बैठक आणि आतल्या खोलीच्या मधे सोडलेल्या झिरमिरीत पडद्या मागे जाऊन उभी राहिली.
उघड्या दारातून तो थेट बैठकीत आला.
त्याच्या व्याकूळ हालचालींतून भेटीची उत्सुकता, ओढ, तगमग सगळं स्पष्ट जाणवत होतं. 
समोर कुणीच नाही म्हटल्यावर तो थबकला, कानोसा घेतला. इतक्यात पडद्यामागे हालचाल जाणवली, त्याच्या चेहर्‍यावर कुठलंसं तेज चमकून गेलं.
"मी आलोय"  त्याने हाक मारली. खड्या आवाजातही मार्दव लपलं नाही. काही क्षण शांतता पसरली. त्याच्या आवाजानिशी ती लगेच बाहेर येईल, तिच्या अबोल चेहर्‍यावर आज समाधान दाटेल, नजरातंला विरह बोलू लागेल, ह्या अपेक्षेने तो तिथेच, तसाच थांबला.
पुन्हा काही क्षण.. हालचालींशिवाय!
तिच शांतता.
त्याला स्वःतचा हा अपेक्षाभंग सोसवत नव्हता.
"अगं, मी, मी आलोय!"
पण; नाही.... सादेला प्रतिसाद नाही.
तसा तो कळवळला.
ती पडद्यामागे, पापण्या झुकलेल्या, तिचा चेहरा स्पष्ट दिसेना... मनातलंही समजेना. विचित्र अवस्था.
खरंतर कालच तो परदेशातून आला होता.
त्याला कालच्या काल तिची भेट घ्यायची होती. पण घरच्यांची मनं राखत त्यांच्याशी चार शब्द बोलत, त्यांची विचारपूस करत त्याला त्याच्या घरीच थांबावं लागलं होतं!
इकडे ती भेटीसाठी आतूरली असेल म्हणून तो आज तडक इथे आला होता, भेटीशिवाय तो ही तिच्याइतकाच तगमगत होता.
ती नेहमीप्रमाणे सलज्ज भेटीसाठी आतूर वाट पहात असेल अशी त्याची अपेक्षा होती.
पण; दृष्य वेगळंच होतं!
त्याला सगळं काही चालणार होतं, पण तिची त्याच्यावरची निष्ठा ढासळलेली तो बघू शकणार नव्हता.
काल ती आसूसलेली होती.
तो आलाय... तिच्या देशी, गावी, तिला समजलं होतं! तो आल्यासरशी धावत येईल, समक्ष भेट घेईल, सोबतीने निवांत वेळ घालवता येईल म्हणून तिने कालचा संपूर्ण दिवस घराबाहेर काढला होता. पण; तो दिवसभर फिरकला नव्हता. संध्याकाळी ती नेहमीच्या नदीकाठच्या जागी कितीतरी वेळ थांबून होती.
ती त्यांची संकेताची जागा होती.
कुठेच नाही जमलं तर इथे भेट घडायची...
नदीकाठच्या त्या जागी फार कुणी फिरकायचं नाही. चिंचोळी पाऊलवाट, दुतर्फा झाडी अशा वाटेनं आलं की तो नदीकाठ लागायचा. तिथेही तो आला नव्हता.
अंधारून आल्यावर ती निराश मनाने घरी परतली होती. तिची स्वस्थता ढळत्या सूर्याबरोबर काळवंडून गेली होती.
आज मात्र तो आला होता
ओढीनं, धावत!
पण; तिला कालच्याच उदासीनं व्यापलं होतं! त्याच्या भेटीसाठी आसूसलेली ती काल दिवसभर भटकत राहिली होती, तो आसपास असूनही भेटला नव्हता.
तिचा रुसवा दोघांची भेट लांबवत होता.
पडदयामागची शांतता असह्य झाली तेव्हा, तो सरसावला. चार पाऊलं पुढे झाला. पडद्याला हात घालणार तोच..
तिची पैजणपाऊलं मागे गेल्याचं त्याला सुस्पष्ट जाणवलं.
म्हणजे तिला भेटण्याची इच्छाच नाही, त्याला समजलं! क्षणात सारा उत्साह मावळला!
तिला तिच्या मनाविरुद्ध तो सहज भेटू शकला असता, त्याची ताकद मोठी होती. पण ताकदीवर भावना पेलणार्‍यातला तो नव्हता.
तो मागे फिरला. तडक तिच्या घराबाहेर पडला, बाहेर रेंगाळलेल्या ढगांच्या फौजेला त्याने इशारा केला आणि क्षणांत उंच उडाला...
तिने हाक मारली नाही. तोही घुटमळला पण थांबला नाही.
मग तो आकाशात उदास मुसमूसत राहिला
रात्रभर तिच्या घरावर झिमझिमत राहिला....
ती खिडकीतून पाहत होती.
त्याचं रेंगाळणं साठवत होती.
उशीरा कधीतरी तिचा डोळा लागला.
सकाळी त्याने उघड दिली होती...
नदीकिनारी ती धावत सुटली. आज पाऊलवाटेवर नेहमीपेक्षा जास्त चिखल झाला होता...
नदीकाठी पाय पोटाशी दुमडून, अंगावर मेघ पांघरून, दमून तो झोपला होता.
-बागेश्री

Featured post

मला भेटलेली गाणी: अप्सरा आली

.... चित्रलेखा लगबगीनं ह्या दालतानातून त्या दालनात, दिसणार्‍या प्रत्येक दास- दासीला काही ना काही अखंड सूचना देत चालली होती. आजचा तिच...