फक्त जरा तग धर
जरासं अंतर पार कर,
मग पुढे तूच तू आहेस पसरलेली... अथांग
तुझाच समुद्र, किनारा तुझा
तझीच लाट, शहारा तुझा..
समूद्राच्या त्या टोकावरचं क्षितीज तुझं
क्षितीजाच्या फळीवरले चंद्र, सूर्य, तारे तुझेच.
हवा तेव्हा हात उचल
फळीवरचा ग्रह उचल, तारा उचल
काहीच नको तर एक हात फिरवून
आकाशाचा रंग घे सावरून
माखून जा
डुंबत रहा
समूद्र- आकाशाच्या
निळसर रेघेवर
रेंगाळत रहा...
सांजेचे रंग तुझ्यावरून ओघळून
समूद्रात विरत जातील तेव्हा
सरता दिवस पोटात घे
फळीवरचा चंद्र आकाशात उधळून टाक..
उल्कांच्या अक्षता अंगावर घे
चराचराची लक्ष्मी हो
सांगितलं होतं ना तुला...
बस जरा तग धर
पुढे तूच आहेस
अथांग...
-बागेश्री
0 Comments